नाशिक : बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी कायमच मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवस्थेचा काहींनी गैरफायदा घेत बाहेरून येणाऱ्या भाविकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे दररोज भाविकांची गर्दी असते. गर्दीच्या नियोजनातंर्गत काही महिन्यांपूर्वी देवस्थानच्या वतीने दिवसभरातील चार भाविकांची संख्या ही ऑनलाईन देणगी दर्शनासाठी ठरवली. याअंतर्गत घरबसल्या ऑनलाईन नोंदणी तसेच देवस्थान परिसरात आल्यावर देणगी दर्शन पावती घेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. एका भाविकाने देवस्थानच्या कार्यालयातून देणगी दर्शन २०० रुपये दराने तीन दर्शन पास घेतले. हे पास संशयित नारायण मुर्तडक (रा. त्र्यंबकेश्वर) याने तिसऱ्याच व्यक्तीला १४०० रुपयांना विकले. हा प्रकार देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी त्र्यंबक देवस्थानच्या वतीने संशयिताविरूध्द पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
यासंदर्भात देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी माहिती दिली. शनिवार आणि रविवारी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. दिवसातून तीन ते पाच हजारांहून अधिक भाविक ऑनलाईन नोंदणी माध्यमातून दर्शन घेतात. देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविकांसह परदेशातीलही भाविक या सुविधेचा लाभ घेत असतात. दर्शन पासचा झालेला गैरप्रकार पाहता यापुढे दर्शन पासवर भाविकांचे छायाचित्र छापण्यात येईल, असे माचवे यांनी नमूद केले.