शहरातील सुश्रृत रुग्णालयाच्या मुख्य संचालक डॉ. प्राची पवार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. करोना काळात डाॅ. पवार यांच्या रुग्णालयात दाखल रुग्णाचा मृत्यू झाल्याने हा हल्ला केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.येथील गोवर्धन शिवारातील पवार फार्मस या शेतघरी १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:२० वाजता डॉ. प्राची पवार या वाहनाने पोहचल्या असता दुचाकीवरुन आलेल्या संशयितांनी त्यांना शेतघराच्या दरवाजाजवळ अडविले. डॉ.पवार यांनी दुचाकी आडवी का लावली, अशी विचारणा केली असता संशयिताने रस्त्यातील दुचाकी बाजूला न करता त्यांचेशी अरेरावी केली. वेळकाढूपणाची भूमिका घेतली. थोड्याच वेळात शेजारील पिकात लपून बसलेले आणखी दोन जण तेथे आले. त्यातील एकाने डॉ. पवार यांच्याशी हुज्जत घालत हातातील धारदार कोयत्याने त्यांच्यावर वार केले. डॉ. पवार यांनी दोन्ही हातांनी वार अडवल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यावेळी तिसऱ्या संशयिताने लवकर करा, मारून टाका, सोडू नका, अशा सूचना दिल्या. त्यानंतर तिघेही मोटारसायकलवर बसून निघून गेले.

हेही वाचा >>>नाशिक : महाआरोग्य शिबिरात साडेसात लाखापेक्षा अधिक रुग्ण तपासणी

याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका डॉक्टर महिलेवर एकटी शेतघरी जात असतांना झालेल्या हल्ल्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक माधुरी कांगणे-केदार, उपविभागीय अधिकारी (ग्रामीण विभाग) अर्जुन भोसले यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखा आणि नाशिक तालुका पोलिसांच्या वतीने गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. संशयित हे गुन्हा केल्यानंतर मोटारसायकलने नाशिक शहराच्या दिशेने भरधाव जात असतांना अपघात झाल्याने ते एका ठिकाणी पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संशयितांनी परिधान केलेले कपडे आणि वर्णनावरून पोलीस पथकाने शहरात तपास सुरू केला. संशयितांनी एका रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी अभिषेक शिंदे (१९, रा. कलानगर), धनंजय भवरे (१९, रा. काचणे), पवन सोनवणे (२२, रा. लोहणेर) यांना अटक केली.

हेही वाचा >>>धुळे जिल्ह्यात मद्य सेवनाचे पाच लाख परवाने वितरीत

संशयितांनी डाॅ. पवार यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. संशयित अभिषेकच्या आत्याचा करोना काळात १२ मे २०२१ रोजी सुश्रृत हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्या गोष्टीचा राग मनात धरून अभिषेकने धनंजय आणि पवन यांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्याचे कबूल करून डॉ. पवार यांना अद्दल घडविण्याच्या उद्देशाने हल्ला करण्याचे ठरविले होते. त्यानुसार अभिषेकने भद्रकालीतून एक हत्यार खरेदी केले होते. घटनेच्या दिवशी डॉ. पवार हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून त्यांच्या आधी शेतघराच्या प्रवेशव्दाराजवळ पोहचून त्यांची गाडी अडवली होती. ठरल्याप्रमाणे इतर दोन साथीदारांसह डॉ. पवार यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केल्याची कबुली दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. प्राची पवार या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या कन्या असल्याने त्यांच्यावरील हल्ल्याच्या तपासासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तालुका पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्ह्यातील तपास कुशल असे १० अधिकारी, ४० पोलीस अंमलदार यांची १० पथके तयार केली होती. १५ दिवसांपासून हा तपास सुरू होता.