नाशिक -नांदगाव तालुक्यातील पोखरी शिवारात शुक्रवारी सकाळी मोटार आणि मालवाहू वाहन यांच्यातील अपघातात निफाड तालुक्यातील जळगाव येथील तीन जणांचा मृत्यू झाला. एकाचा जागीच तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले
नांदगाव तालुक्यातील कासारी येथे विवाह समारंभ आटोपून नवरदेवाच्या भावासह त्याचे सात मित्र मोटारीतून पोखरी शिवाराकडे येत असताना अपघात झाला. नांदगावहून कासारीकडे जाणाऱ्या सिमेंट गोण्यांची मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोशी मोटारीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारीतील तुषार काकड ( रा.जळगाव, निफाड ) याचा जागीच मृत्यू झाला.
इतर सहा सहकारी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नांदगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील नीलेश कराड (२४) आणि अक्षय सोनवणे (रा.जळगाव, ता.निफाड ) या दोघांची प्रकृती चिंताजनक होती. मध्यरात्री त्या दोघांचाही मृत्यू झाला. मोटारीतील इतर सहा जखमींना निफाड, नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे.
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये रुतेश जाधव, गौरव जाधव, तुकाराम सुरके, वैभव वेताळ, प्रताप जाधव (सर्व रा.जळगाव, ता.निफाड ) आणि अमोल आहिरे ( रा.आनंद नगर, ता.नांदगाव) यांचा समावेश आहे. अपघातप्रकरणी मालवाहू वाहन चालक अमोल अहिरे यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात मोटार चालक वैभव वेताळ यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.