धुळे : महावितरणकडून जुलै २०२५ पासून घरगुती ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या टाईम ऑफ डे (टीओडी) योजनेचा उल्लेखनीय फायदा धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील लाखो वीजग्राहकांना मिळू लागला आहे. या योजनेअंतर्गत अवघ्या चार महिन्यांत जळगाव परिमंडलातील ग्राहकांना तब्बल ९५ लाख रुपयांची वीजबिल सवलत मिळाली असून, ग्राहकांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे.
टीओडी योजनेनुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वापरलेल्या विजेवर सवलत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसा वीज वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. जळगाव परिमंडलातील १ लाख ६६ हजार घरगुती ग्राहकांना जुलै ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान एकूण ९४ लाख ८० हजार रुपयांची सवलत देण्यात आली आहे. यामध्ये जळगाव विभागातील ९५ हजार ७८५ ग्राहकांना ५३ लाख ९४ हजार रुपये, धुळे विभागातील ४२ हजार ४४८ ग्राहकांना २२ लाख ५७ हजार रुपये, तर नंदुरबार विभागातील २८ हजार ४६४ ग्राहकांना १८ लाख २९ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे.
महावितरणकडून बसवले जाणारे स्मार्ट टीओडी मीटर पूर्णपणे स्वयंचलित आणि अचूक असून, हे मोफत बसवले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार येत नाही. या मीटरमुळे मानवी हस्तक्षेप पूर्णतः टळतो आणि विजेचे अचूक बील दिले जाते. ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर दर तासाला विजेचा वापर पाहता येतो, ज्यामुळे वीज बचत आणि वापर नियोजन सुलभ होते.
महावितरणने २०२५ ते २०३० या कालावधीसाठी टप्प्याटप्प्याने सवलतींची तरतूद केली आहे. पहिल्या वर्षी प्रति युनिट ८० पैसे, दुसऱ्या वर्षी ८५ पैसे, तिसऱ्या व चौथ्या वर्षी ९० पैसे, तर २०२९-३० मध्ये १ रुपया सवलत लागू होणार आहे. धुळे विभागात सध्या टीओडी मीटर बसवण्याचे काम वेगाने सुरू असून, दररोज शेकडो ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या माध्यमातून वीजबचत वाढवणे, लोड व्यवस्थापन सुधारणे आणि पर्यावरण संरक्षण साध्य करणे हे महावितरणचे उद्दिष्ट आहे.
ग्राहकांनी सहकार्य करावे, मीटर बसवून वीज बचतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, टीओडी योजना केवळ सवलतीपुरती नसून ऊर्जाबचतीकडे समाजाला प्रवृत्त करणारी एक क्रांतिकारक योजना ठरू शकते.
