जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर उच्चांकी एक लाख पाच हजार ८८४ रूपयांपर्यंत पोहोचले होते. शनिवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दराने शुक्रवारचा उच्चांक मोडीत काढून एक लाख सात हजार १२० रूपयांपर्यंत मजल मारली. चांदीच्या दरानेही उच्चांकी एक लाख २५ हजार ६६० रूपयांपर्यंत झेप घेतली.
अमेरिकेकडून आयात शुल्कात वाढ जाहीर झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या बाजारपेठेत मोठी हालचाल दिसून आली आहे. या निर्णयामुळे गुंतवणुकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली असून, सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे वळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. परिणामी, या धातूंच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, आगामी काळातही टॅरिफच्या भीतीमुळे आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोने-चांदीच्या किमती आणखी उंचावण्याची शक्यता आहे. गुंतवणुकदारांसाठी सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आश्रयस्थान ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही सातत्याने वाढ होत आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचा परिणाम फक्त सोन्यावरच नाही, तर चांदीवर देखील स्पष्टपणे जाणवत आहे. चांदीची किंमत प्रति किलो सुमारे १ लाख २५ हजार रुपयांवर पोहोचली आहे.
सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांदीकडेही अनेक गुंतवणूकदार वळताना दिसत आहेत. परंपरेने चांदी ही विश्वासार्ह आणि परवडणारी गुंतवणुकीची धातू मानली जाते. त्यामुळे येणाऱ्या काळात चांदीच्या मागणीत आणि किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये होत असलेल्या वाढीमागे अनेक जागतिक कारणे आहेत. कमोडिटी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतीय रुपया नीचांकी पातळीवर गेल्याने दोन्ही धातूंच्या किमतींवर थेट परिणाम झाला आहे. त्याचबरोबर शेजारील चीनमध्ये सोन्याची खरेदी वेगाने वाढत असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी वाढली आहे.
या सर्वांबरोबरच रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता देखील गुंतवणूकदारांना सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीकडे वळण्यास भाग पाडत आहे. परिणामी, या धातूंच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहेत. जळगावमध्ये शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम एक लाख पाच हजार ८८४ रूपये होते. शनिवारी सकाळी बाजार उघडताच १२३६ वाढ नोंदविण्यात आल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख सात हजार १२० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. ज्यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसला.
चांदीत ३०९० रूपयांनी वाढ
जळगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून चांदीचे दर स्थिर होते. मात्र, शुक्रवारी दिवसभरात १०३० रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्यानंतर चांदीने उच्चांकी एक लाख २२ हजार ५७० रूपयांचा दर गाठला. शनिवारी सकाळी बाजार उघडताच आणखी ३०९० रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने शुक्रवारचा उच्चांक मोडीत काढून चांदीचे दर उच्चांकी एक लाख २५ हजार ६६० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.