नाशिक – संततधार पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याचा परिणाम किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर वाढण्यात झाला आहे. आठवड्यापूर्वी ३० ते ४० रुपये किलो असलेले टोमॅटो आता ६० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. त्यातही उत्तम दर्जाच्या टोमॅटोला प्रतिकिलो ७० ते ८० रुपये असा दर मिळत आहे. पावसामुळे नवीन टोमॅटो लागवडही मंदावल्याने दर अधिक वाढण्याची शक्यता आहे.
मेपासून काही दिवसांचा अपवाद वगळता आतापर्यत नाशिकसह जिल्ह्याच्या अनेक भागात सतत पाऊस सुरु आहे. प्रारंभी वळवाच्या आणि नंतर मान्सूनमुळे उभ्या पिकांना मोठा फटका बसला. विशेषत्वाने सततच्या पावसापुढे निभाव न लागणाऱ्या पिकांचे अधिक नुकसान झाले. त्यात टोमॅटोचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. काही दिवसांपूर्वी नाशिक बाजार समितीत १० हजार क्रेट (२० किलोची जाळी) प्रतिदिन अशी होणारी टोमॅटोची आवक आता सहा ते सात हजार क्रेटपर्यंत आली आहे. पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्याने आवक दिवसेंदिवस कमी होत असल्याचे नाशिक बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. शेतांमध्ये पाणी आणि चिखल असल्याने टोमॅटो काढणीवरही परिणाम झाला आहे. नाशिक बाजार समितीत प्रामुख्याने नाशिक तालुक्यासह कळवण, सिन्नर तसेच निफाड तालुक्यातून टोमॅटो विक्रीसाठी येत असतो.
मागील आठवड्यापासून लासलगाव बाजार समितीतही टोमॅटो लिलाव सुरु झाले. प्रारंभी प्रतिक्रेट अर्थात जाळीला (२० किलो) ६७५ रुपये असा दर मिळाला होता. परंतु, आठवड्याच्या शेवटी हाच दर सरासरी ८५१ रुपये क्रेट असा तर, अधिकाधिक १०५१ रुपये असा राहिला. लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरु झाल्याने त्याचा परिणाम येवला, निफाड तालुक्यातून इतर बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी पाठविल्या जाणाऱ्या टोमॅटोवर झाला आहे. लासलगाव बाजार समितीत निफाडसह येवला आणि जवळच्या चांदवड तालुक्यातून टोमॅटो लिलावासाठी येत आहेत.
टोमॅटो लिलावासाठी प्रसिध्द असलेल्या पिंपळगाव बाजार समितीत शनिवारी सरासरी ७०० रुपये क्रेट असे दर होते. सोमवारी त्यात २०० रुपयांची वाढ होऊन दर ९०० रुपयांपर्यंत पोहचले. सध्या देशातील अनेक राज्यांमध्येही पाऊस पडत असल्याने टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा राज्यांमधूनही टोमॅटोला मागणी असल्याने दर वाढले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पावसाची स्थिती यापुढेही अशीच कायम राहिल्यास टोमॅटो दरवाढीची अधिक शक्यता आहे. पावसामुळे टोमॅटोच्या लागवडीवरही परिणाम झाला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यास टोमॅटो लागवडीला वेग येऊ शकेल.