नंदुरबार – महाराष्ट्रातील थंड हवेची पर्यटन स्थळे म्हणून लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर या ठिकाणांचीच अधिक चर्चा होते. कारण, ही स्थळे मुंबई, पुण्यापासून जवळ आहेत. या स्थळांपर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते आहेत. परंतु, या ठिकाणांच्या तोडीस तोड किंवा अधिक सुंदर अशी पर्यटन स्थळे महाराष्ट्रातील इतर भागातही आहेत. परंतु, प्रसिद्धीत कमी, पुरेशा सुविधांचा अभाव, रस्त्यांची स्थिती चांगली नसणे, यामुळे ही स्थळे मागे राहतात. अशा स्थळांपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे तोरणमाळ.
डोंगर, दऱ्या, निसर्गरम्य परिसर असे सर्वकाही असलेले तोरणमाळ आजपर्यंत तसे दुर्लक्षितच राहिले आहे. स्थानिक नेत्यांची, मंत्र्यांची उदासीनता हेही त्यामागील एक कारण. तोरणमाळला सध्या वेगळीच समस्या भेडसावत आहे.राज्य शासन एकीकडे पर्यटन वाढीच्या गप्पा मारत असतांना दळणवळणाची साधनेच नसतील तर पर्यटन क्षेत्राचा विकास तरी कसा होणार ? महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांच्या सीमावर्ती भागात वसलेले थंड हवेचे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिदु आहे. याठिकाणचे नैसर्गिक सौदर्य नेहमीच पर्यटकांना खुणावत असते.
पर्यटनाच्या अनुषंगाने याठिकाणच्या सुविधांचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यातच दहा महिन्यांपासून तोरणमाळसाठी असलेली बससेवा बंद आहे. अशी स्थिती असेल तर पर्यटनवाढ तरी कशी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे तोरणमाळला जाणारा रस्ता हा अतिशय अरुंद आणि घाट रस्ता आहे. अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या यशवंती या मिनी बसची तोरणमाळसाठी सेवा सुरु होती. या बसच्या शहादा येथून दिवसातून आठ फेऱ्या होत असत. परंतु, या बस दुरुस्तीच्या पलीकडे गेल्याने त्यांचा वापर धोकादायक झाला. त्यामुळे शहादा बस आगाराने डिसेंबर २०२४ पासून तोरणमाळची बससेवा बंद केली. शहादा-तोरणमाळ मार्गावरील केलापाणी या गावापर्यंत मोठी बस जाते. त्यापुढे केलापाणी ते तोरणमाळ हे अंतर १० किलोमीटर आहे. शहादा बस आगाराने वर्षभरापूर्वीच राज्य परिवहन विभागाकडे चार मिनी बस देण्याची मागणी केली होती. परंतु, त्यांच्या मागणीला अद्याप यश आलेले नाही.
तोरणमाळ खोऱ्यात २० हजारापेक्षा अधिक आदिवासी बांधव राहतात. बससेवा १० महिन्यांपासून बंद असल्याने खासगी वाहनांचा आधार आदिवासी बांधवांना घ्यावा लागत आहे. एकेका वाहनात १५ पेक्षा अधिक प्रवासी कोंबले जातात. तोरणमाळ परिसर धडगाव मतदार संघात येत असून याठिकाणचे आमदार शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) तर परिवहन खाते देखील शिंदे गटाकडेच आहे. शहादा हा मतदारसंघ भाजपकडे आहे. सत्ताधारी आमदार, मंत्री असतानाही १० महिन्यांपासून तोरणमाळची बससेवा बंद राहत असेल तर याला काय म्हणावे ? तोरणमाळपर्यंत पोहचण्यात अडचणी येत असल्याने पर्यटकांची पाऊले लगतच्या गुजरातमधल्या सापुताऱ्याकडे वळत आहेत.