नाशिक : शहराजवळ गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा परिसरात रविवारी सुट्टीनिमित्त पर्यटकांची गर्दी उसळली. कोसळणाऱ्या धबधब्यालगतच्या भागात संरक्षक लोखंडी कठड्यांपलीकडे जाऊन अनेक जण सेल्फी, छायाचित्र काढत होते. विशेष म्हणजे, यात पालकांसह लहान मुलांचाही सहभाग होता. काही सेल्फी काढण्यात मनाई केलेल्या भागात गोदावरीच्या वाहत्या पाण्याचा आनंद घेत होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पर्यटनस्थळी धोकादायक क्षेत्रात उतरण्यास मनाई केलेली असताना पर्यटकांनी नियम धाब्यावर बसवले. या परिसरात दुपारी संबंधितांना प्रतिबंध करण्यासाठी कुठलीही यंत्रणा कार्यरत नव्हती.
रविवारी गंगापूर धबधबा परिसरात विपरित चित्र पाहण्यास मिळाले. पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील धबधबा पाहण्यासाठी दिवसभर पर्यटकांची गर्दी उसळली होती. या ठिकाणी धोकादायक ठिकाणी कोणी जाऊ नये म्हणून लोखंडी कठडे बसविलेले आहेत. परंतु, पर्यटक त्या ओलांडून धबधब्याचे पाणी कोसळणाऱ्या खोलगट भागाकडे सेल्फी, छायाचित्र काढण्यासाठी जात होते. त्यांना प्रतिबंध करणारे कुणी नव्हते. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. सेल्फी काढण्यास तसेच ज्या भागात जाण्यास धोका आहे, तिथपर्यंत पर्यटक सहजपणे जात होते. वाहत्या पाण्याचा आनंद घेत होते. पर्यटकांकडून नियम धाब्यावर बसविले जात असताना यंत्रणा मात्र अंधारात असल्याची स्थिती होती.
आवश्यक तिथे पोलीस बंदोबस्त तैनात करावा, या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निर्देशांकडे डोळेझाक झाली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी पर्यटक, पर्यटनस्थळांची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांना सूचना केल्या. प्रतिबंधित धरणे, धबधबे, निसरडी ठिकाणे, जलाशये तसेच ज्या क्षेत्राची माहिती नाही, तिथे जाणे टाळणे गरजेचे असल्याचे सूचित केले. पोलिसांना आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.