नाशिक: मुसळधार पाऊस नसतानाही शहरातील रस्त्यांवर खड्डे, चिखल झाला असून वाहनधारकांना अक्षरश: जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. अनेक प्रमुख चौकात ही स्थिती वाहतूक कोंडीत भर घालत आहे. पावसाळ्याआधी चकाचक दिसणाऱ्या रस्त्यांच्या दुरवस्थेवर शहरवासियांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
लहान-मोठ्या रस्त्यांची चाळण होण्यास सुरुवात झाली आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते. वाहनधारकांना अंदाज येत नाही. परिणामी, अपघातांना निमंत्रण मिळण्याची शक्यता बळावते. अलीकडेच महानगरपालिकेतील विभागप्रमुखांच्या बैठकीत आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी विभागीय कार्यालये आणि बांधकाम विभागाला त्या त्या परिसरातील खड्डे तातडीने बुजविण्याची तंबी दिली होती. पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होणारी ठिकाणे शोधून तिथे उपाय योजनेची साधने उपलब्ध ठेवण्याचे सूचित केले आहे.
हेही वाचा >>>भिडे यांना अटक करा, अन्यथा गोंधळाची स्थिती; छगन भुजबळ यांचा इशारा
पावसात खड्ड्यांची कायमस्वरुपी दुरुस्ती शक्य होत नाही. बारीक खडी वा पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजविले जात आहेत. परंतु, हे काम संथपणे चालल्याने खड्डे नक्की कुठे बुजले, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. खडी, पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजविण्याची प्रक्रिया निव्वळ मलमपट्टीचा प्रकार आहे. पावसाळ्यात वारंवार तोच उपाय अवलंबला जातो. गुणवत्तापूर्ण कामे न झाल्याची परिणती पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यात झाल्याचे गायत्री पारख यांनी सांगितले. आर. डी. चौक ते मायको सर्कल म्हणजे त्र्यंबक रस्तापर्यंत जाणारा मार्ग अतिशय खराब झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा >>>तुकाराम मुंढे यांना जळगावचे आयुक्त करा : प्रहार जनशक्तीची स्वाक्षरी मोहीम
शहरात कुठेही गेले तरी खड्ड्यांची कमतरता नसल्याची प्रतिक्रिया साहेबराव हेम्बाडे यांनी व्यक्त केली. रस्त्यांवरील खड्डे समजत नाहीत. वाहन आदळल्यावर ते लक्षात येते. रस्त्यांवरील खड्ड्यांतून मार्गक्रमण करताना उडणारे पाणी काहीवेळा वादाचेही कारण ठरते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कामटवाडा-अंबड परिसरात सर्वत्र खड्डे आहेत. वाहनचालक घसरणे वा तत्सम प्रकार नित्य घडत असल्याकडे उज्वला पवार यांनी लक्ष वेधले. अशोका मार्ग-वडाळा गावाकडे जाणारा मार्ग खड्डे व चिखलमय आहे. परिसरातील कॉलनी रस्ते आकाराने लहान आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाण्याची डबकी होतात. त्यामुळे स्थानिकांना पायी चालणे अवघड झाल्याचे सुजाता हिंगे यांनी नमूद केले.
हेही वाचा >>>नाशिक : व्यावसायिकास बंदुकीच्या धाकाने लूटमार; संशयित ताब्यात
दीड हजार किलोमीटरच्या रस्त्यांवर कसरत
शहरात सुमारे २२०० किलोमीटरचे रस्ते आहेत. यात दीड हजार किलोमीटरचे डांबरी तर ३०० किलोमीटर काँक्रिट रस्त्यांचा समावेश आहे. उर्वरित १५० किलोमीटरचे खडीकरण झालेले (कच्चे रस्ते) आणि १५० किलोमीटरचे झोपडपट्टी क्षेत्रातील रस्ते आहेत. खड्ड्यांची मुख्य समस्या डांबरी रस्त्यांवर भेडसावत आहे. डांबर-पाणी यांचे समीकरण कधीही जुळत नाही. पावसाळ्यात डांबरी रस्त्यांवर खड्डे पडण्याचे ते महत्वाचे कारण दिले जाते. त्यामुळे या काळात दुरुस्तीत डांबराचा वापर करता येत नाही.
इतर पर्याय वापरा
पावसाळ्यात डांबरमिश्रित खडीने खड्डे बुजविण्याचे काम कठीण असले तरी इतर पर्याय वापरून हे काम करायला हवे. मुंबई-नाशिक महामार्गावर विशिष्ट साहित्याचा प्रयोग होत आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी महामार्गावर भेट देऊन पाहणी केली आहे. खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने तसे पर्याय वापरायला हवेत. शहरात अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्र्यंबक रस्ताही त्यास अपवाद नाही. कायमस्वरुपी रस्ते चांगले व्हावे यासाठी प्रयत्न करावे लागतील. – छगन भुजबळ (अन्न नागरी पुरवठामंत्री)