नाशिक : पंचवटी आणि मध्यवर्ती बाजारपेठेच्या आसपासच्या भागात स्मार्ट सिटी योजनेतील कामांसाठी अलीकडेच वाहतुकीवर निर्बंध आले असताना आता त्र्यंबकनाका ते गंजमाळ सिग्नल दरम्यानच्या रस्त्यावर जलवाहिनी आणि रस्ता दुरुस्तीसाठी टप्प्याटप्प्याने काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारपासून त्र्यंबक नाक्याकडून गंजमाळ सिग्नलकडे जाण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गंजमाळकडून त्र्यंबक नाका सिग्नलपर्यंतची एकेरी वाहतूक मात्र सुरू राहील. स्मार्ट योजनेतील कामांमुळे पुढील काही महिने मध्यवर्ती भागातील रस्ते खोदकामाच्या भोवऱ्यात सापडणार आहेत. मुख्य बाजारपेठेतील आधीचीच कामे मार्गी लागली नसताना स्मार्ट सिटी कंपनीकडून विविध कामांसाठी खोदकामाचे सत्र नवीन वर्षांत कायम राहिले आहे. विद्युत वाहिनी, मल वाहिनी आणि गटार आदी कामांसाठी काही दिवसांपूर्वी सात ते आठ रस्त्यांवरील वाहतूक एकेरी अथवा काही रस्त्यांवर ती बंद करण्यात आली होती. त्यात त्र्यंबक नाका ते गंजमाळ सिग्नल दरम्यानच्या रस्त्याची नव्याने भर पडली आहे. ही कामे करताना नियोजनाचा अभाव त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या स्मार्ट रस्त्याच्या कामावेळी उघड झाला होता. त्यातही हे काम इतके रखडले की, विद्यार्थ्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालय, बस स्थानक, न्यायालयात येणाऱ्या सर्व घटकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला होता. त्या कामासाठी लागलेल्या निर्बंधांमुळे सभोवतालच्या रस्त्यांवरील वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. एकाच वेळी पुन्हा विविध रस्त्यांवरील वाहतुकीवर निर्बंध आल्याने त्याची पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर आहे.

त्र्यंबकनाका-गंजमाळ सिग्नल दरम्यानच्या मार्गावरील वाहतूक निर्बंधाची अधिसूचना पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े यांनी काढली आहे. त्यानुसार जलवाहिनी आणि रस्त्याचे काम होईपर्यंत गंजमाळ सिग्नलकडून त्र्यंबक नाका सिग्नलकडे केवळ एकेरी वाहतूक सुरू राहील. त्र्यंबकनाका सिग्नलकडून गंजमाळ सिग्नलकडे जाण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. तसेच रस्त्यांचे काम होणारा हा मार्ग १२० दिवसांसाठी वाहनतळविरहित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. याच मार्गावर जिल्हा परिषद, मुख्य टपाल कार्यालय आणि सायकल विक्रीची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी त्र्यंबक नाक्याकडून येणाऱ्यांना मोठा वळसा घालणे भाग पडणार आहे.

यापूर्वी निर्बंध आलेले मार्ग

गंगापूर रस्त्यावर पोलीस आयुक्त ते गुरांचा दवाखाना (अशोकस्तंभ), गंगापूर रोड ते गायखे रुग्णालय, प्रमोद महाजन उद्यान ते विठ्ठल मंदिर पर्यंतचा रस्ता, रविवार कारंजा ते बिर्ला नेत्र रुग्णालय (सुंदरनारायण मंदिर) मार्ग,  शालिमारकडून सांगली बँक सिग्नलकडे जाण्यासाठीचा मार्ग, घनकर गल्लीतील सायन्स स्टडी सेंटर ते मणियार गल्ली रस्ता, सीबीएस सिग्नलकडून कान्हेरेवाडी (कालिदास कला मंदिर) जाणारा मार्ग, जुना दूध बाजार रस्ता ते गंजमाळ सिग्नल रस्ता, पंचवटीतील हॉटेल तुळजा (सरदार चौक) ते गाडगे महाराज पूलपर्यंतचा रस्ता, न्यू पेरीना आइस्क्रीम चौक ते कपालेश्वर मंदिपर्यंतचा रस्ता यावर निर्बंध आणण्यात आलेले आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic restrictions for smart city plan works in nashik city zws
First published on: 20-01-2022 at 00:01 IST