पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सर्वत्र वृक्षारोपण सुरू असताना दुसरीकडे इगतपुरी तालुक्यात  ब्रिटिश काळात रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या वडाच्या झाडांची कत्तल सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. इगतपुरीच्या अस्वली स्थानक ते दारणा धरण रस्त्यावरील अनेक वटवृक्ष तोडले जात असून वन विभागाने त्याकडे कानाडोळा केल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

ब्रिटिश राजवटीत दारणा धरणाचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी लेक बिल फाटा-अस्वली स्थानक- नांदगाव बुद्रुक रस्त्याच्या दुतर्फा वटवृक्ष लावले आहेत. मोठय़ा प्रमाणावर वाढलेल्या झाडांनी परिसराचे निसर्गसौंदर्य खुलवले आहे. रस्त्यावरील रहदारीला कोणत्याही प्रकारे अडथळा नसणारी अनेक झाडे जाणीवपूर्वक तोडली जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. झाडे तोडताना न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीचा संबंधितांना सोयीस्कर विसर पडला. या भागातील वन विभागाने झाडे तोडणाऱ्या कंत्राटदाराला पाठीशी घातल्याचे सांगितले जाते. संबंधितांकडे झाडे तोडण्याबाबत कोणतीही परवानगी नसून केवळ झाडांच्या फांद्या छाटणी करण्याबाबत त्यांनी इगतपुरी वन विभागाच्या कार्यालयात अर्ज दिल्याचे सांगितले जा. झाडे तोडण्याबाबत कोणतीही परवानगी नसताना वन विभागाच्या आशीर्वादाने जुन्या झाडांना मृत्युपंथाला सामोरे जावे लागत आहे. उपयुक्त झाडांची कत्तल करणाऱ्यांवर वन कायद्यानुसार तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी इगतपुरी तालुक्यातील वृक्षप्रेमींनी केली आहे.

अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास न्यायालयीन आदेशांचा अवमान केला म्हणून खटला दाखल करण्याची तयारी वृक्षप्रेमींनी केली आहे. दरम्यान, या भागासाठी नेमलेले वन अधिकारी-कर्मचारी कधीच या परिसराकडे फिरकत नाहीत. वास्तविक या परिसरात विविध जातींची दुर्मिळ झाडे आढळून येतात.

वन विभागाच्या दुर्लक्षामुळे बऱ्याच झाडांची बेकायदा कत्तल झाल्याचे गंभीर प्रकार घडले आहेत. ज्यांच्यावर वन संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे ते अधिकारी अशा प्रकारांना खतपाणी घालत असल्याची तक्रार करत संबंधितांविरोधात वृक्षप्रेमींना आक्रमक भूमिका घ्यावी लागणार असल्याचे कैलास कडू यांनी सांगितले.

माहिती घेऊन कारवाई

उपरोक्त भागात जुन्या वडांच्या झाडांची तोड करण्यास कोणालाही परवानगी दिलेली नाही. तथापि असे काही घडत असल्यास माहिती घेऊन उचित कारवाई करण्यात येईल.

– आर. पी. ढोमसे (वन परिक्षेत्र अधिकारी, इगतपुरी)