नाशिक : आदिवासी विकास विभागाने कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत सुधारणा, आयटी क्षमतेत वाढ आणि पात्र लाभार्थ्यांना वेळेत सेवा प्रदान करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या संकल्पनेतून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ साधने निर्मितीसाठी विजयभूमी विद्यापीठाशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार आदिवासी विकास विभागाच्या प्रशासनात डिजिटल परिवर्तनाची नांदी ठरण्याची शक्यता आहे.

आदिवासी विकास विभाग आणि विजयभूमी विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य कराराने महाराष्ट्र शासनाच्या ‘डिजिटल भारत-आत्मनिर्भर महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी मिळणार आहे. आदिवासी विकास आयुक्तालयात पार पडलेल्या कार्यक्रमात आयुक्त लीना बनसोड, विजयभूमी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू आणि भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (एनआयईएलआयटी) माजी महासंचालक डॉ. अश्विनीकुमार शर्मा, विजयभूमी स्कूल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे अधिव्याख्याता डॉ. सलूर पटनायक यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

आदिवासी क्षेत्रात प्रशासनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी, डिजिटल सेवा वितरण वाढविण्यासाठी आणि सामाजिक-आर्थिक दरी कमी करण्यासाठी एआयची मदत होणार आहे. एआय साधने आणि डिजिटल फलाटांमुळे आदिवासी विकास विभागाच्या कामकाजाची गतिमानता वाढणार आहे. त्यातूनच शासकीय योजनेच्या अंमलबजावणीला गती मिळणार असून, त्यांचा मागोवा घेणे सुकर होणार असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. शर्मा यांनी सांगितले.

दरम्यान, सामंजस्य कराराच्या माध्यमातून आदिवासी विभागात डिजिटल इनोव्हेशन सेलची स्थापना करण्यात येणार आहे. सामाजिक प्रणालींमधील एआयवरील थेट संशोधन प्रकल्प तसेच विजयभूमी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना वास्तविक प्रशासन समस्यांवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सामंजस्य कराराची उद्दिष्टे

शासकीय योजनांच्या देखरेखीसाठी एआय प्रणालीची निर्मिती. सेवा वितरण वेळेत कपात. सार्वजनिक तक्रार निवारण फलाट वाढविणे. आदिवासी बोलीभाषांमध्ये मोबाइलआधारित डिजिटल सहायक प्रोटोटाइप. कर्मचाऱ्यांना एआय वापर आणि डेटा सुरक्षिततेवर प्रशिक्षण देणे, ही सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये आहेत.

‘एआय’च्या मदतीने प्रशासन अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि पारदर्शक होण्यासाठी विजयभूमी विद्यापीठाशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे विभागामध्ये डिजिटल क्षमता निर्माण केली जाईल. ‘एआय’चा प्रभावी वापर विभागाच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचे पाउल राहणार आहे.-लीना बनसोड (आयुक्त, आदिवासी विकास विभाग)