नंदुरबार – इयत्ता दहावी, बारावी परीक्षांमध्ये ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल, त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्याचे संकेत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांसंदर्भात राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तीमाही परीक्षांसह शिक्षकांचीही तीमाही चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या शैक्षणिक दर्जाचे मूल्यमापन होणार असल्याचे मंत्री डाॅ. गावित यांनी येथे सांगितले.

राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांचा दर्जा सुधारावा, यासाठी सध्या आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या बांधकामासाठी कोट्यावधींचा निधी देण्यात आला आहे. यातून अनेक प्रकल्पातील आश्रमशाळा आणि वसतिगृहांचा कायापालट होत असतांना दुसरीकडे आश्रमशाळांमधील शैक्षणिक दर्जाबाबत चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता याबाबत कठोर पावले उचलले जात आहेत. त्यामुळेच यापुढे आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये दहावी, बारावी परीक्षेत ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल, त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्यात येईल, असा निर्णय विभागाने घेतल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले. आश्रमशाळेतील मुले पहिलीपासून दहावीपर्यत आश्रमशाळेतच राहत असतांना ते नापास होतातच कसे, असा प्रश्न उपस्थित करुन या मुलांना कमीतकमी ७५ टक्के गुण मिळायला हवेत, असे गावित म्हणाले.

हेही वाचा >>>नाशिक: दहावीचे गुणपत्रक, दाखले देण्यास अडवणूक; शिक्षणाधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा

विभागाच्या अखत्यारीतील अनुदानित आणि नामांकित शाळांमध्ये नववीत जितकी मुले असल्याचे दाखवून अनुदान घेतले जाते. प्रत्यक्षात दहावीत तितकी मुले परीक्षॆला बसतच नसल्याचे निदर्शनास आले आहे. नववीतील संख्येप्रमाणे मुले जर दहावीच्या परीक्षेला बसली नाहीत, तर तफावतीतील दहा वर्षाच्या अनुदानाची रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाईल, असे डॉ. गावित यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. गावित यांच्या हस्ते भालेर, वाघाळे आणि लोय येथे मुलांचे वसतिगृह आणि आश्रमशाळेचे लोकार्पण झाले. यावेळी शासन विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा देण्यात कुठेही कमी पडत नसल्याने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा देखील सुधारायला हवा, असा सज्जड दमच त्यांनी शिक्षकांना दिला.