शालेय पोषण आहारातील शासकीय वस्तूंची बेकायदेशीर साठवणूक करणे आणि त्यांची काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संशयितांच्या ताब्यातून २४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शालेय पोषण आहारातील धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने येथील ताश्कंद बाग भागातील गोदामातून एका मालमोटारीत भरले जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांना मिळाली होती. त्यानुसार पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी छापा टाकला असता एका गोदामाबाहेर उभ्या असलेल्या मालमोटारीत तांदुळाच्या गोण्या भरल्या जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच या गोदामाची तपासणी केली असता तेथे तांदूळ, गहू, हरबरा, वटाणे, मुगदाळ, मिरची पावडर, हळद पावडर, साखर अशा वस्तूंचा साठा केल्याचे आढळून आले.

या सर्व वस्तू शासनाकडून पोषण आहार म्हणून विद्यार्थ्यांना मोफत पुरविण्यासाठीच्या असल्याचेही चौकशीअंती निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी शेख उबेद शेख बाबू (अक्सा काॅलनी, मालेगाव) व प्रल्हाद सावंत (लळिंग, धुळे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून शालेय पोषण आहारातील वस्तू, मालमोटार, वजनकाटा, शिवण यंत्र असा २४ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित शेख उबेद हा साठा करुन ठेवलेल्या शासकीय धान्याचा काळाबाजार करणारा असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तर प्रल्हाद हा मालमोटारीचा चालक असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: नाशिक; जात पंचायतीच्या मध्यस्थीने घटस्फोट झालेल्या अल्पवयीन मुलीची प्रसुती; मुलीच्या वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयेशानगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवरे, उपनिरीक्षक विजय गोपाळ, पोलीस कर्मचारी मनोज चव्हाण,विजय घोडेस्वार,रोहित मोरे यांनी या कारवाईत भाग घेतला होता. शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी या पुढील तपास करीत आहेत. हा माल संशयितांनी कुठून प्राप्त केला होता, त्याचा कुठे पुरवठा करण्याचा इरादा होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याची उकल करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.