जळगाव – संशयित प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात मुंबईत पोस्को कायद्यांतर्गत बलात्कार आणि हनी ट्रॅपसंबंधी दोन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, लोढा याने भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याविषयी काही धक्कादायक खुलासे वर्षभरापूर्वी एका व्हिडीओतून केले होते. तो व्हिडीओ राष्ट्र्वादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी सोमवारी समोर आणल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
हनी ट्रॅपमध्ये देशभरातील सुमारे ७२ अधिकारी आणि इतरही बरेच प्रतिष्ठित अडकल्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे प्रकरण केवळ अधिकाऱ्यांपुरते मर्यादित नसून काही मोठे राजकीय नेतेही त्यात अडकल्याचा सनसनाटी आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत असताना लोढाच्या जामनेर तालुक्यातील मालमत्तेची झडती घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, कुटुंबातील सदस्यांचे भ्रमणध्वनी आणि इतर महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे यापूर्वीच जप्त केली आहेत. त्यातून पोलिसांना हनी ट्रॅप प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. आमदार एकनाथ खडसे यांनीही प्रफुल्ल लोढा आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे पूर्वापर घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप करून हे प्रकरण चांगलेच तापवले आहे.
संशयित प्रफुल्ल लोढा आणि मंत्री महाजन यांच्यात पूर्वी खूप सख्य होते. परंतु, नंतर त्यांचे दोघांचे संबंध बिघडले. लोढा याने महाजन यांच्यावर मागे काही दिवसांपूर्वी अनेक गंभीर आरोप केले होते, असाही दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे यांनी पुरावा दाखल समोर आणलेल्या वर्षभरापूर्वीच्या त्या व्हिडीओत प्रफुल्ल लोढा हा मंत्री महाजन आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप करत आहे. तसेच जामनेर पोलिसात त्यांच्याविषयी तक्रार दिल्याचेही सांगताना दिसत आहे. मी जर बटन दाबले तर संपूर्ण देशात खळबळ उडेल. मात्र, त्यामुळे निरपराध पाच-पंचवीस लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून मी शांत आहे. मला पुरावे मागण्याचा प्रयत्न कोणीच करू नये. ट्रायडंट हॉटेलजवळ तीन महिने तुम्ही माझे पाय पडून थकल्याचे विसरला असाल, असेही वक्तव्य लोढा याने त्या व्हिडीओत केले आहे. दरम्यान, मग असे काय घडले की ज्यांच्यापासून जीवाला धोका होता त्यांच्याच मांडीवर तुम्ही जाऊन बसला, असा टोला एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढा यास हाणला आहे. ट्रायडंट हॉटेल जवळ कोण कशासाठी यांची खुशामत करत होता हे जनतेला कळायला हवे, असेही खडसे यांनी म्हटले आहे.