जळगाव – चालकाचा ताबा सुटल्याने मोटार रस्त्याच्या कडेला सुमारे ५०० फूट दूर फेकली जाऊन चार वेळा उलटली. या अपघातात मोटारीतील दोघांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर आहेत. जळगाव जिल्ह्यात पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील विचखेडे गावाच्या अलीकडे गुरुवारी रात्री हा अपघात झाला. धुळे जिल्ह्यातील तरवाडे येथील रहिवासी राहुल अहिरे (२८) आणि नीलेश पाटील (२३) ही मृतांची नावे आहेत. पारोळ्याकडून धुळ्याकडे जाणाऱ्या मोटारीत नीलेश पाटील, गोविंद राठोड (२४,रा. तरवाडे), राहुल अहिरे हे तिघे आणि महेश पाटील (२१, रा. मोंढाळे, पारोळा) हे चौघे होते.

हेही वाचा >>> नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

मोटार पारोळा शहरानजीक असलेल्या विचखेडा गावाच्या अलीकडे आली असता चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे मोटार रस्त्याच्या कडेला चार वेळा उलटून ५०० फुटावर थांबली. त्यात राहुल पाटील याचा जागीच मृत्यू झाला. तर नीलेश पाटील याला धुळे येथे रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. महेश देवरे आणि गोविंद राठोड हे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका आणि महामार्गाची १०३३ तसेच नरेंद्राचार्य महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गोविंदा राठोड यांनाही धुळे येथे हलविण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.