जळगाव – जिल्ह्यातील दोन कापूस जिनिंग उद्योजकांची सुमारे एक कोटी ३५ लाख ७६ हजार रुपयांत फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, उत्तराखंडमधील बीएसटी टेक्सटाईल मिल्स कंपनीच्या तीन संचालकांवर शहरातील औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील उमाळे येथे वल्लभ अग्रवाल यांचा कापूस जिनिंग कारखाना आहे. त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या कापसाची खरेदी-विक्री ते खासगी दलालांमार्फत करतात. तयार गाठी कापसाच्या मिल्सला विकतात. तीन वर्षांपूर्वी त्यांची ओळख दिनेश हेगडे यांच्यामार्फत उत्तरांखड राज्यातील बीएसटी टेक्सटाईल मिलचे संचालक मुकेश त्यागी यांच्याशी झाली. त्याच ओळखीचा फायदा घेऊन मुकेश त्यागी याने वल्लभ अग्रवाल यांच्याकडून सुमारे ९७ लाखांच्या कापूस गाठी खरेदी केल्या. मात्र, पैसे देण्याची वेळ आल्यावर टाळाटाळ केली. दरम्यान, तालुक्यातील म्हसावद येथील अशोक पोरवाल यांनाही त्यागीने सुमारे ३९ लाखांच्या कापूस गाठी खरेदी करून त्याचे पैसे दिलेले नव्हते. अखेर दोन्ही उद्योजकांनी एकत्रित जळगावच्या औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात जाऊन मुकेश त्यागी आणि अन्य दोघांच्या विरोधात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी बीएसटी टेक्सटाईल मिलचे संचालक संशयित मुकेश त्यागी, संगीता त्यागी आणि निखिल त्यागी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

संशयित, त्यागी परिवाराच्या विरोधात मध्य प्रदेशातील धामणोद पोलीस ठाण्यातही दोन कोटी १९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. त्याचाही संदर्भ वल्लभ अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत दिला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील करीत आहेत