जळगाव – जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे दोन जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी शहरात ट्रॅक्टरच्या पुढे जाण्याच्या नादात दुचाकीवर मागे बसलेले ७८ वर्षीय वृद्ध पडल्यानंतर अज्ञात वाहनाखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत जळगावात दाम्पत्याच्या दुचाकीला अपघात होऊन वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

पारोळा येथील रहिवासी युसूफ शेख (७८) आणि अस्लम शेख (४४) हे पिता-पुत्र जळगावातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्रतपासणीसाठी आले होते. तीन दिवसांपासून ते रुग्णालयातच होते. शुक्रवारी त्यांना घरी सोडण्यात आले. अस्लम हे वडील युसूफ यांच्याबरोबर दुपारी दुचाकीने पारोळा येथे घरी जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावरून ते जात असताना युसूफ यांचा अचानक तोल गेला. ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून येणार्‍या भरधाव वाहनाखाली आले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी धाव घेतली.

काहींनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात मद्यपींच्या भरधाव मोटारीने चौघांना चिरडले, विद्यार्थिनीसह वृद्धाचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरा अपघात आयटीआयजवळ झाला. पुतण्याला पाहण्यासाठी निघालेल्या वृद्ध दाम्पत्याच्या दुचाकीला अवजड वाहनाने धडक दिली. त्यात शहरातील प्रेमनगरमधील रहिवासी पुष्पा पाटील (६६) यांचा मृत्यू, तर त्यांचे पती गुणवंत पाटील (७०) जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी राष्ट्रीय महामार्गावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेनजीक झाला. घटना घडल्यानंतर त्यांना काही वाहनधारकांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तेथे गुणवंत पाटील यांना दाखल करून घेण्यात आले, तर पुष्पा पाटील यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी त्यांना मृत घोषित केले.