जळगाव – गावठी बंदुकांची तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी केल्यानंतर पुणे आणि धाराशिवच्या दोन तरूणांना चार गावठी बंदुका आणि आठ जीवंत काडतुसांसह पकडण्यात आले. जिल्ह्याच्या सीमेवरील मध्य प्रदेशातील पार उमर्टी येथून अवैध अग्नीशस्त्र व दारूगोळा बनवून विकला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलिसांकडून गेल्या महिनभरापासून २४ तास नाकाबंदी केली जात आहे. त्यानुसार, रावसाहेब पाटील आणि घनःश्याम पाटील हे दोघे पोलीस कर्मचारी सत्रासेन नाक्यावर बुधवारी नाकाबंदीच्या कर्तव्यावर असताना त्यांना उमर्टी नाक्याकडून सत्रासेनकडे एक दुचाकी भरधाव वेगात येताना दिसली. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून रस्त्यावर तातडीने बॅरिकेट लावले. मात्र, दुचाकी चालकाने दुसऱ्या रस्त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. रावसाहेब पाटील यांनी शिताफीने त्याच्यावर झडप घातली. त्यामुळे दुचाकीवरील दोघे खाली पडले. पोलिसांनी दुचाकी चालक मंथन गायकवाड (२२, रा. वडाळा, ता. वाशी, जि. सोलापूर; ह.मु. हडपसर, पुणे) याच्या बॅगेतून तीन गावठी बंदुका आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली. याशिवाय, दुचाकीवर मागे बसलेला स्वप्निल कोकाटे (३२, रा. रुई, ता. वाशी, जि. धाराशिव) याच्या ताब्यातून एक गावठी बंदूक आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.
रावसाहेब पाटील यांनी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यास घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल भवारी, श्रेणी उपनिरीक्षक बापू साळुंके, हवालदार चेतन महाजन, विशाल पाटील आणि इतरांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पंचानामा करून सर्व गावठी बंदुका, काडतुसे पोलीस ठाण्यात आणण्यात आली. दरम्यान, अटकेतील संशयित मंथन गायकवाड आणि स्वप्निल कोकाटे यांच्या चौकशीतून त्यांचे साथीदार अप्पासाहेब गायकवाड (रा. गोजवड, जि. धाराशिव) तसेच कानीफनाथ बहीरट (रा, संभाजीनगर) हे त्यांच्यासोबत असल्याचे निष्पन्न झाले. ते दोघे धुळे येथे थांबले होते आणि त्यांनी गावठी बंदुका आणण्यासाठी कानिफनाथ बहीरटच्या मित्राची दुचाकी धुळे येथून घेऊन मदत केली होती. अटकेतील दोन्ही संशयित हे बंदुका घेऊन फरार आरोपींना चारचाकी गाडीतून सुरक्षित वाहतूक करण्यासाठी देणार होते, अशी माहिती त्यांनी पोलीस चौकशीत दिली. त्याचप्रमाणे त्यांना उमर्टी येथील पाजी नावाच्या शिकलकराने बंदुका आणि काडतुसे ५० हजार रुपयांना विकल्याची कबुली दिली. मंथन गायकवाड याच्यावर यापूर्वीही बंदुका विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. सदरची शस्त्रे दोन्ही तरूण कोणाला विकणार होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.