नाशिक – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण राज्याच्या दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. लवकरच नाशिकला येणार आणि संपूर्ण राज्यात दौरा करणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर भेट घेतली.

हेही वाचा >>> नाशिक : सुखोई अपघाताने शेतीचे लाखोंचे नुकसान

यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर. महानगरप्रमुख विलास शिंदे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे उपस्थित होते. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटात थेट लढत होती. यात मोठ्या फरकाने ठाकरे गटाने विजय मिळवून शिंदे गटावर मात केली. संस्मरणीय विजय मिळवल्याबद्दल ठाकरे यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांचे अभिनंदन केले. आगामी निवडणुकांसाठी हा विजय पक्षाला निश्चितच बळ देणारा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले. ठाकरे यांनी लवकरच नाशिकला येणार असल्याचे संकेत दिले. तसेच राज्याचा दौरा करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी डी. जी.सूर्यवंशी, निवृत्ती जाधव, केशव पोरजे, संजय चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.