नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर दस्तक’ उपक्रमाअंतर्गत करोना लसीकरण वेगाने करावे, अशी सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी येवला तालुका आढावा बैठकीत केली. याप्रसंगी तहसीलदार प्रमोद हिले, पोलीस निरीक्षक भूषण मथुरे, ग्रामीण पोलीस निरीक्षक भौरी, नगरपरिषद मुख्याधिकारी संगिता नांदुर्डीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सागर चौधरी, उमेश पाटील, कृषी अधिकारी कारभारी नवले, महावितरण अधिकारी आर. एम. पाटील आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिवृष्टी पंचनामे, शेतकऱ्यांना भरपाई मिळाली की नाही, संजय  गांधी निराधार योजना, पंतप्रधान आवास योजना, बांधकाम, वीज, महावितरण, वन, करोना संक्रमण याविषयी माहिती घेण्यात आली. संबंधित सर्वच विभागाकडून नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. तक्रारींचे निवारण करण्याच्या सूचना डॉ. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

ग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन ही योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचविण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे. ही योजना व्यवस्थित राबविण्याचे आवाहनही डॉ. पवार यांनी केले.

आढावा बैठकीत प्रत्येक गावाचा गावनिहाय लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. पूर्व सूचना न देता रोहित्र बंद करू नका, असे आदेश वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत जिल्ह्यातील पीक पाहणी आढावा, अतिवृष्टीमुळे शेतीचे, घरांचे,  पशुधन नुकसानीचे पंचनामे, शासनाने घोषित केलेल्या मदतीचे वाटप, पीक विमा, पीक कर्ज वाटप,  पीक हंगामाची तयारी जिल्ह्यातील योजना व इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister health instructs expedite vaccination ysh
First published on: 17-11-2021 at 01:17 IST