नाशिक : येथील शंकराचार्य न्यास आणि संस्कार भारती यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त अनोख्या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील ४० कलाकारांनी प्रदर्शनात सहभाग नोंदविला. वेगवेगळय़ा क्षेत्रांतील मान्यवर, स्वातंत्र्यसेनानी, अयोध्येतील राम मंदिर, गोदाघाट असे देशाचे आणि नाशिकचे महत्त्व सांगणाऱ्या रांगोळय़ांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. १८ ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले आहे.

गंगापूर रस्त्यावरील शंकराचार्य संकुल येथे आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, ज्ञानेश सोनार आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत झाले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शंकराचार्य न्यासने संस्कार भारतीच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरवले आहे. त्यासाठी देशभरातून ४० रांगोळी कलाकार दोन दिवस नाशिकमध्ये वास्तव्याला आले. त्यात महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांतील तसेच गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, हैदराबाद या ठिकाणांहून आलेल्या कलाकारांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून देशाची शक्तिस्थाने रेखाटली. ५०० किलोहून जास्त रांगोळी वापरून ४० रांगोळय़ा साकारण्यात आल्या. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि भारत देशाच्या प्रगतीसाठी ज्यांचे बहुमूल्य योगदान लाभले, त्याची चित्रे या कलाकारांनी रेखाटली आहेत.

या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता शास्त्रीय संगीत गायिका मंजिरीताई असनारे-केळकर यांच्या आवाजातील वंदे मातरम् गायनाने झाली. त्यानंतर ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत झाले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चालक विजयराव कदम हेही उपस्थित होते. रांगोळी प्रदर्शन उद्घाटन सोहळय़ात प्रास्ताविक न्यासचे अध्यक्ष आशीष कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर संस्कार भारतीचे अखिल भारती भूअलंकरण संयोजक रघुराज देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला. प्रसिद्ध चित्रकार  ज्ञानेश सोनार यांनी त्यांच्या खास शैलीत कलाकारांशी संवाद साधला. जेव्हा एक कलाकार दुसऱ्या कलाकारांशी संवाद साधतो तेव्हा तो संवाद मनाचा मनाशी, कलेचा कलेशी केलेला संवाद असतो. नाशिककरांनी तो अनुभवला. प्रदर्शन १८ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वासाठी खुले आहे. नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यासतर्फे करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.