नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा प्रशासकीय पातळीवर आव्हानात्मक ठरत असतांना नाशिक पोलिसांच्या वतीने अपुऱ्या मनुष्यबळावर पर्याय म्हणून विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी शहर परिसरातील महाविद्यालयांशी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने चर्चा सुरू आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीस वरिष्ठ वर्गातील प्रथम वर्षास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून स्वयंसेवक म्हणून अर्ज भरून घेण्यात येतील. दुसरीकडे, विद्यापीठ पातळीवर कुंभमेळ्यात विद्यार्थ्यांकडून देण्यात येणाऱ्या सेवा किंवा त्यांची स्वयंसेवकाची भूमिका हा विषय अभ्यासक्रमात कसा घेता येईल, यावर काम करण्यात येत आहे.
प्रयागराज कुंभमेळ्यानंतर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कुंभमेळ्यात अमृत पर्वणी काळात होणारी गर्दी, स्थानिकांचा यामध्ये असणारा सहभाग पाहता गर्दीचा महापूर नियंत्रणात आणणे प्रशासनासमोर आव्हानात्मक ठरणार आहे. वरिष्ठ पातळीवर यासाठी सुक्ष्म नियोजन सुरू असतांना नाशिक शहर पोलिसांच्या वतीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाने वेगळा प्रयोग करण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंसह शहरातील वरिष्ठ महाविद्यालयांमधील प्राध्यापकांशी विद्यार्थ्यांना स्वयंसेवकाच्या भूमिकेत आणण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे.
एप्रिल महिन्यात या अनुषंगाने यासंदर्भात वरिष्ठ महाविद्यालयांचे प्रतिनिधी,विद्यापीठाचे डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य आदींबरोबर बैठक पार पडली. यामध्ये अपुऱ्या मनुष्यबळावर तोडगा म्हणून विद्यार्थी स्वयंसेवकाच्या भूमिकेत असतील, असा प्रस्ताव मांडण्यात आला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या संदर्भात पुन्हा बैठक झाली. याविषयी व्यवस्थापन परिषद सदस्य वैद्य यांनी माहिती दिली. कुंभमेळ्यासाठी होणारे काम नियोजनबध्द होण्यासाठी विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे.
गुणांशी संबंधित क्रेडीट बँकशी या विद्यार्थ्यांना जोडण्यासंदर्भातील अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत व्हावी, याअनुषंगाने चर्चा सुरू असल्याचे वैद्य यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या कलानुसार त्यांना वाहतूक, आरोग्य, वाहनतळ, कॉल सेंटरसह २५ सेवांसाठी काम देण्यात येईल.
हा सर्व विषय अभ्यासक्रमात कसा बसवता येईल, यावर काम सुरू असल्याचे वैद्य यांनी नमूद केले. दुसरीकडे, नाशिक पोलिसांच्या वतीने वरिष्ठ महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या वेगवेगळ्या शाखांतील विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात येत आहे. त्यांच्याकडे अर्ज देण्यात आले असून लवकरच याविषयी चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, सध्या कला, वाणिज्यचे वर्ग सुरू झाले असले तरी विज्ञानसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरु असल्याने हा विषय रेंगाळला आहे.