नाशिक : सोमवारी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १०७ गावांतील ७२९ हेक्टवरील पिके व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नैसर्गिक संकटाची ३५१८ शेतकऱ्यांना झळ बसली. सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक ५०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यात ६१२ हेक्टवरील आंब्याचे नुकसान झाले.

एप्रिलच्या मध्यावर तापमानाने ४० अंशाचा टप्पा ओलांडला. त्याच दिवशी म्हणजे सोमवारी सुरगाणा, बागलाण, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण आदी भागात वादळी वाऱ्यासह अवकाळीने हजेरी लावली होती. पावसाचा सर्वाधिक फटका सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यांना बसल्याचे कृषी विभागाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. १५ एप्रिल रोजी झालेल्या पावसामुळे ६४९ हेक्टरवरील आंब्याचे नुकसान झाले. ७१.९० हेक्टरवरील कांदा आणि ८.४० हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा…सिन्नर तालुक्यात समृध्दीवर अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर

नैसर्गिक संकटात एकूण १०७ गावे बाधित झाली. या गावांमधील ३५१८ शेतकऱ्यांना फटका बसला. तालुकानिहाय विचार करता सुरगाणा तालुक्यात ६८ गावे (२७७३ शेतकरी), त्र्यंबकेश्वर ३२ गावे (६३७ शेतकरी) आणि पेठ तालुक्यातील सात गावे (१०८) बाधित झाली. सध्या जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याची स्थिती असून कमालीचा उकाडा जाणवत आहे. सोमवारनंतरही दररोज वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे पिकांचे किती नुकसान झाले, याची स्पष्टता अद्याप झालेली नाही. १५ तारखेचा नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.

सुरगाणा तालुक्यात पिकांसोबत अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली होती. पेठ तालुक्यात वीज पडून गोपाळ महाले यांची म्हैस मृत्युमुखी पडली. त्र्यंबकेश्वरमध्ये वादळी पावसात घरांसह पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील बहुतांश भाग दुष्काळाला तोंड देत आहे. त्यात नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हेही वाचा…नाशिक : रथयात्रेमुळे वाहतूक मार्गात बदल

कृषी विभागाचा अहवाल

सोमवारी सुरगाणा, बागलाण, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण आदी भागात वादळी वाऱ्यासह अवकाळीने हजेरी लावली होती. सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून उघड झाले. पावसामुळे ६४९ हेक्टरवरील आंबा, ७१.९० हेक्टरवरील कांदा आणि ८.४० हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नैसर्गिक संकटात १०७ गावांमध्ये नुकसान झाले. सुरगाणा तालुक्यात पिकांसोबत अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याचा उल्लेख आहे.