नाशिक : एखादा नेता, आमदार गेला तर शिवसेनेला फरक पडत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संस्थान निर्माण केले आहे. आज नाशिक भेटीत नवे चेहरे बघितले. मतदारांना आमच्या पक्षाबद्दल आस्था आहे तोपर्यंत काही फरक पडत नाही, असा दावा शिवसेना (उध्दव ठाकरे) युवा सचिव आ. वरूण सरदेसाई यांनी केला.

आ. सरदेसाई हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर असतांना त्यांनी उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पक्षाच्या कामकाजाविषयी चर्चा केली. संघटनेचे काम कसे सुरू आहे, काही अडचणी, आगामी निवडणुकांमध्ये काय भूमिका घ्यायची, याबाबत चर्चा करण्यात आली. काही नियुक्त्या आम्हाला करायच्या आहेत . खरे तर विधानसभेचे निकाल फक्त महाविकास आघाडीसाठी नाहीतर महायुतीलाही धक्कादायक होते. राहुल गांधींनी आवाज उठविला. दुसऱ्या बाजूला मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर जनतेचा रोष आहे. विरोधी पक्षाकडे जनता आशेने पाहत आहे. आमच्या पक्षाचे नगरसेवक निवडून येतील. महापौर आम्हीच ठरवू, असा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त केला. विधानसभेचे धक्कादायक निकाल लागले आहेत. मी स्वतः संशोधन करतोय. मतदान यादीची छाननी करतोय. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे हे दोन्ही २० वर्षांनी एकत्र आले. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर आले. दोन्ही पक्षांचे प्रमुख जागावाटपावर बोलतील, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

महायुतीची चुकीची कामे जनतेपर्यंत पोहोचवा…

राज्यातील भ्रष्ट महायुती सरकारच्या चुकीच्या कामाविरोधात रस्त्यावर उतरा, लाडकी बहीण योजनेतून महिलांची नावे वगळल्याचा जाब विचारा, विविध मार्गांचा अवलंब करून आंदोलने करा, नवख्या लोकांशी, नवमतदारांशी संपर्क वाढवा. मतदार नोंदणीवर भर द्या, आपली संघटनात्मक ताकद वाढवायची आहे. आपल्या कामातून आपली ओळख निर्माण करा, असे आवाहन आ. वरुण सरदेसाई यांनी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या समस्या, संघटनेचा आढावा घेत मार्गदर्शन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर, उत्तर महाराष्ट्रातील संघटना बांधणीच्या दृष्टीने युवा सेनेच्या सर्व रिक्त पदांवर लवकरच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. तसेच जिल्हानिहाय युवासेनेचे मेळावे घेण्यासाठी प्रयत्न करू, असेही आमदार सरदेसाई यांनी म्हटले आहे