देशाच्या पंतप्रधानांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी व्हायला हवे. परंतु, ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही प्रचाराला येत असून हे दुर्देवी आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौरा करण्याला आक्षेप घेत पंतप्रधान पदाची पातळी आता ग्रामपंचायतीपर्यंत आल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदानासाठी जांभळ्या स्केच पेनचा वापर करण्याचे निर्देश

नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे रतन बनसोड हे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ शनिवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यावर त्यांनी टीका केली. पंतप्रधान आता थेट मनपा निवडणुकीत प्रचाराला येत आहेत. देशात सध्या हुकुमशाही, दंडेलशाही सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात शिवसेनेने (ठाकरे गट) आमचा पाठिंबा मागितलेला नाही. शिवसेनेसोबत अद्याप आमचे नाते जमलेले नाही. आम्ही सध्या केवळ एकमेकांना खाणाखुणा करीत आहोत, अशा विनोदी शैलीत त्यांनी उत्तर दिले.

हेही वाचा >>> नंदुरबार जिल्ह्याची साडेपाच कोटींची औषध खरेदी रखडली, तांत्रिक मान्यता मिळूनही विलंब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक पदवीधर मतदारसंघात घराणेशाही, पैसेशाही विरोधात तसेच निवृत्ती वेतन योजना आणि शिक्षण व्यवस्थेविरोधात ही लढाई आहे. शिवसेना-वंचितमध्ये आघाडीबाबत बोलणी सुरू आहे. अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. उध्दव ठाकरे यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी तो त्यांचा प्रश्न आहे. ठाकरे यांची काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेण्याची इच्छा आहे. आमचाही दोघांना विरोध नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांनी घेऊन यावे. आपण त्यांच्या गळ्यात हार घालायला तयार आहोत. पण त्यांनी मान पुढे करायला हवी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ओबीसी, गरीब मराठा सत्तेत नको आहे. आमची भूमिका गरीब ओबीसी, मराठांसोबत आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला आपण नको आहे. यामुळे आघाडीला मुहूर्त लागत नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. आता आघाडी संदर्भातील पुढील निर्णय उध्दव ठाकरे यांनी घ्यायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.