धुळे : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेला दणदणीत विजय हा ”दुधात साखर” असल्याचे सांगत, धुळे जिल्ह्यातही तसाच एकतर्फी निकाल लागू शकतो, असा ठाम विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.शिरपूर-वरवाडे, शिंदखेडा, दोंडाईचा-वरवाडे आणि पिंपळनेर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

रावल म्हणाले की, जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत झालेला प्रगतीचा वेग, रस्ते-विकास, जलसंधारण, उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांमुळे जनता भाजपाच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. लोकशाहीत सर्वांनाच उमेदवारीचा अधिकार आहे. महायुती किंवा महाआघाडी यांच्यासह पाहिले तर अर्धा डझन पक्ष राजकीय व्यासपीठावर सक्रिय आहेत. परंतु जनता नेहमीच विकासाच्या बरोबर उभी राहते हे पुन्हा सिद्ध झाले, असे ते म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुती होण्याची शक्यता कमी झाल्याचेही रावल यांनी स्पष्ट केले. नामांकनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या टप्प्यातही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात धुळे जिल्ह्यात कुठेही महायुती होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिथे महायुतीची एकमताने बैठक शक्य नसेल, तिथे ‘फ्रेंडली फाईट’ होईल, असे ते म्हणाले. रावल यांनी जिल्ह्यातील चारही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाची संघटना अत्यंत नियोजनबद्ध रीतीने कार्यरत असल्याचे सांगितले. दोंडाईचा, शिंदखेडा, शिरपूरनंतर पिंपळनेर येथेही आज उमेदवारी दाखल होणार आहे. प्रत्येक निवडणुकीच्या अनुषंगाने आमचा आमदार, आमचे मुख्य नेते आणि त्यांच्या टीमसह संपूर्ण यंत्रणा सक्रिय आहे, असे ते म्हणाले.

धुळे जिल्ह्याची राजकीय पार्श्वभूमी

धुळे जिल्ह्यात परंपरेने काँग्रेसचा प्रभाव होता. मात्र गेल्या दहा ते पंधरा वर्षांत भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक ताकद, विकासकामे आणि नेतृत्वाच्या माध्यमातून आपले राजकीय वर्चस्व मजबूत केले. शिरपूर परिसरात माजी मंत्री पटेल यांचा प्रभाव, दोंडाईचा आणि शिंदखेड्यातील स्थानिक नेत्यांची पकड, तसेच रावल यांचे राज्यस्तरीय नेटवर्क यांचा भाजपाला फायदा झाला आहे. माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या स्थानिक राजकारणातील प्रभावामुळे जिल्हास्तरावर भाजपाचे बळ सर्वाधिक वाढण्यास मदत झाली आहे असे राजकीय गोतात मानले जाते. गेल्या काही निवडणुकांत जिल्ह्यातील नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपाला जनतेची स्पष्ट पसंती मिळाल्याचे अनेक दाखले आहेत.

एकतर्फी निकालाची शक्यता प्रबळ

बिहारचा निकाल हा दुधात साखर. जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातही निकाल एकतर्फी लागू शकतात, असा आत्मविश्वास रावल यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला शोभेल असा निकाल धुळे जिल्ह्यातून लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा आम्ही करणारच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच पालकमंत्री रावल यांच्या विधानामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.