मालेगाव : एका परप्रांतीय तरुणाने येथे चक्क उड्डाण पुलावरून उडी मारण्याची थरारक घटना घडली आहे. या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या तरुणाच्या बोलण्यात असंबंधपणा जाणवत असल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यातूनच त्याने उड्डाण पुलावरून उडी मारली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नवीन बस स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या अरुंद संरक्षक भिंतीवर चढून अत्यंत धोकेदायक स्थितीत तो चालत असल्याचे काही लोकांच्या दृष्टीस पडले. तेव्हा तसे करू नये म्हणून त्यास काही लोकांनी हटकले. मात्र तो ऐकण्याच्या मनःस्थितीत असल्याचे दिसत नव्हते. काही जणांनी मग जवळ जाऊन संरक्षक भिंतीच्या खाली त्याने उतरावे म्हणून प्रयत्न सुरू केले. मात्र तो अजिबात दाद देत नव्हता. बराच वेळ अरुंद भिंतीवरून इकडून तिकडे चालण्याचा त्याचा धोकादायक खेळ सुरू होता. यावेळी उड्डाण पुलाखाली बघ्यांची गर्दी झाली. संरक्षक भिंतीवरुन खाली उतरण्यासाठी उपस्थित लोकांकडून त्याची मनधरणी सुरू असतानाच अचानक त्याने उड्डाण पुलावरून खाली उडी मारली.
जवळपास ३० फूट उंचीच्या या उड्डाण पुलावरून थेट सिमेंटच्या रस्त्यावर पडल्याने हा तरुण गंभीर जखमी झाला. उपस्थित लोकांनी त्याला तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्यास मार लागला असून दोन्ही पायांचे व हाताचे हातही मोडले आहे. बिट्टू कुमार असे स्वतःचे नाव असल्याची माहिती या तरुणाने दिली. तसेच बिहार राज्यातील रहिवासी असल्याचे आणि काम शोधण्यासाठी महाराष्ट्रात आल्याचे त्याने सांगितले. या तरुणाजवळ भ्रमणध्वनी नव्हता की आधारकार्ड, त्यामुळे त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधने अवघड वाटले. तेव्हा काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून या तरुणाला खोदून खोदून घरातील व्यक्तींचा भ्रमणध्वनी क्रमांक विचारला गेल्यावर त्याने एक क्रमांक दिला. या क्रमांकावर संपर्क साधल्यावर तो चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. हा परप्रांतीय तरुण महाराष्ट्रात कशासाठी व कोणाबरोबर आला याचा पोलीस शोध घेत आहेत.