विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय प्रत्येकी एक अशा जिल्ह्य़ातील १५ मतदारसंघांत एकूण १५ केंद्रांवरील सर्व जबाबदारी ७५ महिला अधिकारी-कर्मचारी सांभाळणार आहेत. प्रत्येक केंद्रावर साधारणपणे चार अधिकारी आणि एक कर्मचारी असतात. मतदारसंघनिहाय ‘सखी’ केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे.  जिल्ह्य़ात एकूण ४५७९ मतदान केंद्र असून त्यातील १५ केंद्रांत मतदानाची संपूर्ण प्रक्रिया ७५ महिला सांभाळणार आहेत. लोकसभा निवडणुकीत ‘सखी’ केंद्रांची संकल्पना प्रत्यक्षात आली होती. विधानसभा निवडणुकीतही ती राबविली जाणार आहे.

नाशिक मध्य मतदारसंघात गंगापूर रस्त्यावरील महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयातील केंद्र, नाशिक पश्चिममध्ये शिवशक्ती चौकातील नवजीवन विद्यालय, नाशिक पूर्वमध्ये दिंडोरी रस्त्यावरील पुणे वसतिगृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, देवळालीत छावणी मंडळातील देवळाली हायस्कूल, इगतपुरीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दिंडोरीत उमराळे रस्त्यावरील व्ही. एन. नाईक महाविद्यालय, निफाडमध्ये वैनतेय महाविद्यालय, सिन्नर मतदारसंघात चांडक कन्या विद्यालय, येवल्यात विंचूर रस्त्यावरील जनता विद्यालय, चांदवडमध्ये जिल्हा परिषद उर्दू शाळा, कळवणमध्ये जिल्हा परिषदेची सेमी इंग्रजी शाळा, बागलाणमध्ये

जिजामाता कन्या विद्यालय, मालेगाव बाह्य़मध्ये मालेगाव कॅम्प येथील पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय, मालेगाव मध्य मतदारसंघात आरम प्राथमिक शाळा आणि नांदगावमध्ये जिल्हा परिषद शाळा ही ‘सखी’ केंद्रे असणार आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका केंद्राची जबाबदारी चार अधिकारी आणि एक कर्मचारी असे एकूण पाच जण सांभाळतील. ‘सखी’ केंद्रांची जबाबदारी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आहे.