नाशिक – उन्हाची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागात टंचाईच्या झळा त्याहून तीव्र होत आहेत. पावसाळ्यात मुबलक पाऊस होऊनही उन्हाळ्याच्या मध्यावर जिल्ह्यातील सात तालुक्यातील ११५ गाव आणि वाड्यांना टँकरने पाणी पुरविण्याची वेळ आली आहे. तसेच कळवण तालुक्यात दोन गावांसाठी खासगी विहीर अधिग्रहीत करण्यात आली आहे.
पावसाळ्यात अखेरपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्याने लहान-मोठी धरणे, तलाव तुडूंब भरली होती. त्यामुळे यंदा पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नसल्याची स्थिती होती. परंतु, पारा उंचावू लागला, तसे पाणी टंचाईचे चटके बसू लागले. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अहवालावरून अनेक भागात यंदाही तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याचे अधोरेखीत होत आहे.
जिल्ह्यात ४७ गावे आणि ६८ पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे. यात टंचाईची सर्वाधिक झळ येवला तालुक्यास बसत आहे. या भागातील ३१ गावे आणि ४१ वाड्या अशा ७२ ठिकाणी २९ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. त्याखालोखाल मालेगाव तालुक्यात १७ गाव-वाड्या (सात टँकर), सिन्नर आठ वाड्यांना (तीन टँकर), सुरगाणा तीन गावे (तीन टँकर), चांदवड दोन गावे (दोन टँकर) तर इगतपुरी सात गाव-वाड्या ( एक टँकर) आणि देवळा तालुक्यात चार गाव-वाड्या (दोन टँकर), पेठ तालुक्यात दोन गावांना दोन टँकरने पाणी पुरवले जात आहे. सध्या जिल्ह्यात ४९ टँकरद्वारे ५१ फेऱ्या मारल्या जात आहेत.
१६ विहिरी अधिग्रहित
तहान भागविण्यासाठी प्रशासनाने १६ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. कळवण तालुक्यात दोन गावांसाठी दोन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या. टँकर भरण्यासाठी मालेगावमध्ये सर्वाधिक सात, येवला तालुक्यात तीन, पेठमध्ये दोन, सुरगाणा आणि देवळा तालुक्यात प्रत्येकी एक विहीर अधिग्रहित झाली आहे.
८३ हजार ग्रामस्थांची टँकरवर भिस्त
जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ८२ हजार ४५१ ग्रामस्थांची टँकर आणि अधिग्रहित केलेल्या पाण्यावर भिस्त आहे. यात सर्वाधिक ५५ हजार १६९ लोकसंख्या ही येवला तालुक्यातील आहे. मालेगाव तालुक्यातील १३ हजारहून अधिक ग्रामस्थांना टंचाईची झळ बसत आहे.