पाणी पुरवठय़ातील अनियमितपणा तसेच कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठय़ामुळे सतत चर्चेत राहणाऱ्या नांदगावमध्ये जलवाहिनी दुरूस्त करण्यात न आल्याने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही.
शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या मोठी हाळी, श्रीकृष्णनगर या भागास मंगळवारी तब्बल १६ दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात आला. नळाला पाणी येणार म्हणून महिलावर्गाने घरातील भांडी, पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या. नियोजित वेळ होऊनही पाणी येत नसल्याचे लक्षात आल्यावर पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याकडे विचारणा करण्यात आली. पाणी पुरवठा सुरू करण्यात आल्याची त्याने माहिती दिली. भुयारी गटारीतून लेंडी नदीपात्रात मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत असल्याचे एका महिलेच्या लक्षात आले. तेव्हा भुयारी गटार करताना जलवाहिनी फुटून बरेचसे पाणी गटारीतून वाहून गेल्याचे दिसून आले. नगरपरिषद प्रशासनास त्यासंदर्भात निवेदन देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. गटारीचे काम करताना पालिकेने खबरदारी न घेतल्याने जलवाहिनी फुटल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास नागरिकांनी आणून दिले. ढिसाळ नियोजनामुळे भागास पाण्यापासून वंचित राहावे लागल्याचा आरोपही नागरिकांनी केला. प्रशासनातर्फे त्वरीत तक्रारीची दखल घेऊन दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे नागरिकांना वाटले होते. परंतु, बुधवारी दिवसभरात दुरूस्तीचे काम न झाल्याने पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला. निवेदनावर विद्यमान नगराध्यक्षांचे पती व माजी नगरसेवक राजेंद्र गायकवाड तसेच माजी नगराध्यक्ष प्रभाकर मोकळ, भास्कर कदम यांसह देविदास भावसार, ज्ञानेश्वर बोरसे आदी नागरिकांची स्वाक्षरी आहे.