Lalit Patil Breaking News in Marathi : अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला ललित पाटीलच्या अखेर मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून तामिळनाडूच्या चेन्नईतून त्याला अटक केली आहे. अटकेनंतर आजच त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या बाबी आज उघडकीस येण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ललित पाटील याच्या आईनेही प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही ९ मराठीशी त्यांनी संवाद साधला.

“ते जे निर्णय घेतील तो घेतील. पण त्याने काही मोठा गुन्हा केला नाहीय. त्यामुळे त्याचं एन्काऊटर करण्याचं काहीच कारण नाही. एवढे मोठे मोठे गुन्हे करतात ते सुटतात आणि फिरतात. मग ललितने काय केलंय असं? त्यामुळे त्याचा एन्काऊंटर करू नका. त्याच्या मागे दोन मुलं आहेत. आई-वडिल आहेत”, असं त्या म्हणाल्या.

“पोलिसांना एवढीच विनंती आहे की त्याचा एन्काऊंटर करू नका. पोलीस पुन्हा आले होते. तपासणी केली. भुषणला घेऊन आले होते. तेव्हाच भीती वाटत होती की ललितचा एन्काऊंटर करतील की काय. ते बोलूनही गेले की ते सापडले की त्याचा एन्काऊंटर करू”, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >> मोठी बातमी! अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेल्या ललित पाटीलला तामिळनाडू येथून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

“त्याला फसवलंय हे त्याने सांगावं. जे शिक्षा देतील त्याला सामोरं जावं. तो फसला गेलाय त्यामुळे तोही घाबरून गेला असेल. मुंबई पोलिसांनी त्याला पकडलंय त्यामुळे त्याने सांगावं की त्याला फसवलं गेलंय. पैशांसाठी त्याला टॉर्चर केलं गेलं. म्हणून त्याने पलायन केलं. राजकारणीही तेच म्हणत आहेत की त्याने एवढा काय गुन्हा केलाय. त्याचं हर्नियाचं ऑपरेशन होणार होतं. त्याला चेकअपला नेलं असताना डॉक्टर म्हणाले की आज ऑपरेशन केलं आणि उद्या तुला नेलं तर तू जगू शकणार नाही. म्हणून तो घाबरून निघून गेला”, असं त्या म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही जन्म दिला त्याला, हा आमचा गुन्हा आहे का? आम्ही काय केलंय असं, आई-बापांनी जन्म दिला हा गुन्हा नाहीय ना. मी फार टेन्शनमध्ये आहे. पोलीस येथे येऊन आम्हाला त्रास देत आहेत. लहान लहान नातू आहेत, त्यांना म्हणतात तुमची जिंदगी बरबाद झाली. असं म्हणायची काय गरज आहे का?”, असा आर्त सवाल ललितच्या वडिलांनी केला आहे.