नाशिक – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे अध्यक्ष असणाऱ्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्यावतीने रविवारी नाशिकमध्ये राज्यस्तरीय कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यभरातून आठ ते १० हजार एसटी कर्मचारी सहभागी होण्याचा अंदाज आहे. यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सुट्टी घेतल्याने रविवारी संपूर्ण राज्यातील एसटी वाहतूक विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. परंतु, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसे काही होण्याची शक्यता नसल्याचा दावा केला आहे.
सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचा तिसरा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार आहे. यानिमित्त रविवारी दुपारी १२ वाजता राज्यस्तरीय कामगार मेळावा व अधिवेशन येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात होत आहे. मेळाव्याच्या उद्घाटनासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रित करण्यात आले आहे. अधिवेशन संघटनेचे प्रमुख गोपीचंद पडळकर आणि कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली होईल. तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या संघटनेने अल्पावधीत संपूर्ण राज्यात विस्तार केला. सध्या संघाचे ४० ते ४५ हजार एसटी कर्मचारी सभासद असल्याचे पदाधिकारी सांगतात. मेळाव्यातून जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी संघटनेच्या धुरिणांनी केली आहे.
विशेष म्हणजे, या अधिवेशनात कर्मचाऱ्यांना सहभागी होणे सुलभ व्हावे म्हणून राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक मोहनदास भरसट यांनी संबंधितांना शिल्लक रजेतून रजा मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. अर्थात. दैनंदिन एसटी वाहतुकीवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यासही त्यांनी बजावले आहे.
सेवा सुरळीत राखण्याचे आव्हान
नागपूरसह इतर दूर अंतराहून मेळाव्यात सहभागी होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी दोन दिवस तर, नाशिक आणि लगतच्या जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांनी एक दिवसाच्या सुट्टीसाठी अर्ज सादर केले आहेत. रजेचे हजारो अर्ज आल्या्मुळे एसटी वाहतूक सुरळीत कशी ठेवायची, असे आव्हान विभाग नियंत्रक कार्यालयांसमोर उभे ठाकले आहे. नाशिकमध्ये अनेकांनी सुट्टी मागितल्याने तीन ते चार आगारांची सेवा ठप्प होऊ शकते. अशीच परिस्थिती राज्यात इतरत्र उद्भवू शकते. रविवारी एसटी वाहतूक सुरळीत राखण्यासाठी नियोजन केले जात असल्याचे अधिकारी सांगतात.
वाहतुकीवर परिणाम होणार नसल्याचा दावा
मेळाव्यास किमान सात ते आठ हजार एसटी कर्मचारी सहभागी होतील. त्यादृष्टीने भोजन व तत्सम व्यवस्था करण्यात आली आहे. साडेतीन हजार क्षमतेचे सभागृह अपुरे पडणार असल्याने बाहेरील बाजुला दोन पडद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी होणार असले तरी राज्यातील एसटी वाहतुकीवर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण, एसटी महामंडळात सुमारे ९० हजार कर्मचारी आहेत, असे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे विभागीय सचिव बाळकृष्ण आव्हाड यांनी सांगितले. एसटीवर शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही मेळाव्यासाठी रविवार हा शालेय सुट्टीचा दिवस निवडला. स्थापनेनंतर संघटनेने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रभावीपणे पाठपुरावा केला. आज संघटनेचे ४० हजारहून अधिक सभासद आहेत. या अधिवेशनात त्यांच्याशी संबंधित प्रश्नांवर मंथन होईल, असे आव्हाड यांनी नमूद केले.