जळगाव – जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ.सतीश पाटील यांच्यासह दोन माजी आमदार व इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. अशा स्थितीत शरद पवार व अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे अमळनेरचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, पाटील यांनी आत्ताच काका किंवा पुतण्याच्या बाजूने न जाता तटस्थ राहणार असल्याचे ‘लोकसत्ता’ला सांगितले.
कृषिभूषण साहेबराव पाटील हे मूळचे राजवड (ता.पारोळा) येथील रहिवासी असले तरी, त्यांची कर्मभूमी अमळनेर तालुका आहे. २००९ मध्ये अमळनेरमधून अपक्ष उमेदवारी करून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी तत्कालिन आघाडीला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच अजित पवार यांच्याशी निर्माण झालेल्या घनिष्ठ संबंधाचा फायदा घेऊन नंतरच्या काळात तापीवरील पाडळसरे प्रकल्पासाठी मोठा निधीही आणला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारी दिली. परंतु, शिरीष चौधरी यांच्यासारख्या नवख्या अपक्षाने त्यांचा पराभव केला. तेव्हापासून माजी आमदार पाटील यांनी विधानसभेचा नाद सोडून अमळनेर पालिकेवर लक्ष केंद्रीत केले. कालांतराने त्यांच्या पत्नी पुष्पलता पाटील अमळनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष देखील बनल्या. शासनाकडून बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमणधारकांना संरक्षण दिल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने नगराध्यक्षांसह काही नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई प्रस्तावित करण्यात आली. ती टाळण्यासाठी शेवटी पुष्पलता पाटील यांच्यासह इतर नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागला होता. माजी आमदार पाटील यांनाही त्यावेळी नाईलाजाने भाजपमध्ये काही काळ सक्रीय व्हावे लागले. मात्र, भाजपमध्ये ते जास्त दिवस रमले नाहीत. नंतरच्या काळात दुसऱ्या पक्षातही गेले नाहीत.
नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जळगावमधील राष्ट्रवादीच्या (शरद पवार) मेळाव्याला अचानक हजेरी लावून त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अमळनेरच्या उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करून सर्वांना धक्का दिला होता. प्रत्यक्षात अमळनेरची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्यामुळे कृषिभूषण पाटील यांचा मोठा हिरमोड झाला. दरम्यान, अजित पवार यांनी स्वतः पाटील यांची भेट घेण्याचा प्रयत्न अमळनेर दौऱ्यावर असताना त्यावेळी केला होता. परंतु, पाटील यांनी त्यांची भेट टाळली. तेव्हापासून अमळनेर मतदारसंघातील राजकीय, सामाजिक कार्यक्रमात पाटील यांचा फारसा सहभाग दिसून येत नाही.