महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पुरस्कार जाहीर; पुण्यात जूनमध्ये वितरण सोहळा

जळगाव – एरंडोल येथील साहित्यिक विलास मोरे यांना त्यांच्या पांढरे हत्ती काळे दात या कादंबरीला पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे वा. म. जोशी स्मृती उत्कृष्ट कादंबरी हा साहित्य क्षेत्रातील सन्मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून २५० कांदबर्‍यांमधून विलास मोरे यांची पांढरे हत्ती काळे दात या कादंबरीची निवड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीता राजे पवार, कार्याध्यक्ष उद्धव कानडे यांनी वार्षिक ग्रंथ पारितोषिके जाहीर केली. पुरस्कार वितरण सोहळा २६ जूनला सकाळी अकराला पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामवंत इंग्रजी लेखक इतिहासकार आणि विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या पुरस्कार वितरण सोहळ्याला साहित्य परिषदेच्या विश्‍वस्त सभेचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्‍वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्‍वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष तानाजीराव चोरगे व राजीव बर्वे उपस्थित राहणार आहेत. प्रा. हरी नरके, विजय बाविस्कर, डॉ. राजेंद्र दास, अरुणा साबणे यांनाही ग्रंथकार पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे येथील मुख्य शाखेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

हेही वाचा >>>लासलगाव बाजार समितीत दोनही गट एकत्र; सभापतिपदी बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापतिपदी गणेश डोमाडे

यापूर्वी साहित्यिक विलास मोरे यांच्या पांढरे हत्ती काळे दात या कादंबरीस महाराष्ट्र साहित्य परिषद जामनेर शाखेचा पुरस्कारही जाहीर झाला आहे. तसेच २०१९-२०चा महाराष्ट्र शासनाच्या बालवाङ्मयातील बालकवी पुरस्कार, सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचा बालसाहित्याचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा हा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार विलास मोरे यांना प्राप्त झाल्यामुळे खानदेशातील औदुंबर साहित्य रसिक मंच, सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघ (एरंडोल), सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ (जळगाव), वि. दा. पिंगळे, प्रा. डॉ. म. सु. पगारे, अ‍ॅड. मोहन बी. शुक्ला, कवी रमेश पवार, अशोक कोळी, साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल अशा विविध व्यक्ती व संस्थांतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: White elephant black teeth excellent novel by vilas more amy
First published on: 25-05-2023 at 15:54 IST