मनमाड येथून जवळच असलेल्या येवला तालुक्यातील कातरणी येथील बुधल्या डोंगरावर रात्री पेटलेला वणवा सोमवारी पहाटे नियंत्रणात आला. आगीत पाच हेक्टरवरील गवत तसेच काटेरी, झुडपी वनस्पती भस्मसात झाली. पक्ष्यांची झाडांवरील घरटी, त्यातील पाखरांनाही झळ बसली. अन्य वन्य प्राणी दुसरीकडे पळून गेले. वन विभागाने स्थानिक ग्रामस्थ आणि स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळवले.

आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी कातरणी येथील बुधल्या डोंगरावरील गवत कमी होऊन, झाडे-झुडपे नष्ट झाल्यास परिसर मोकळा होईल. त्यामुळे बिबट्यासारख्या प्राण्यांचा वावर कमी होईल, या उद्देशाने काहींनी मुद्दाम ही आग लावल्याचा संशय व्यक्त होत आहे. पंधरा दिवसांपासून परिसरातील खेड्यांमध्ये तसेच मनमाड शहरातही नागरी वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. तीन ठिकाणी वन विभागाने पिंजरेही लावले.

रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बुधल्या डोंगरावरील गवताने पेट घेतल्याचे लक्षात आल्यानंतर कातरणी, कातरवाडी परिसरातील ग्रामस्थ, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्वरीत धाव घेतली. ब्लोअर व आग विझवण्याचे इतर साहित्य, लिंबाच्या फांद्यांच्या मदतीने ३० ते ४० ग्रामस्थांनी संपूर्ण परिसरात रात्रभर जीवाची बाजी लावत आगीवर नियंत्रण मिळविले.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मनमाड आणि येवला येथील अग्निशमन दलाशी वारंवार संपर्क साधूनही तेथून मदत उपलब्ध झाली नसल्याचे वन्य पशू प्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी सांगितले. आगीमुळे परिसरातील हरणे, तरस, माकड या वन्यप्राण्यांसह मेेंढ्या, पशु-पक्षी हे रातोरात दुसऱ्या डोंगराकडे पळाले. पक्ष्यांची झाडावरील घरटी, त्यातील पिल्ले भक्ष्यस्थानी पडल्याचे निदर्शनास आले.

पाच हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान

वन विभागाने आगीत पाच हेक्टरवरील गवत, पालापाचोळा, साबर आणि इतर काटेरी वनस्पतींचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर रात्री नियंत्रण मिळविण्यात आले. डोंगराच्या पायथ्याशी वन विभागाने वनीकरण केले आहे. या ठिकाणी हरणांसह वन्य प्राण्यांचा वावर असतो. आग तिथे पोहोचण्याआधीच विझविण्यात आल्याचे वनरक्षक गोपाळ राठोड यांनी सांगितले. रस्त्याने ये-जा करताना बिडी फेकल्याने आग लागू शकते. आगीचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले.