लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचे दूरगामी परिणाम होतील. पाणी फुगवट्याने सांगली, कोल्हापूर या भागात होणाऱ्या नुकसानीमुळे मुख्यमंत्र्यांनीही याआधीच धरणाची उंची वाढविण्यास विरोध केला होता. केंद्र सरकारच्या अलमट्टीची उंची वाढविण्याच्या निर्णयाचा अभ्यास केला जाईल. यामुळे उपरोक्त भागात पुन्हा संकट उद्भवणार असल्यास त्यास विरोध केला जाईल, अशी भूमिका राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली.

येथे आयोजित कृषी महोत्सवाचा समारोप मंत्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अलमट्टीबाबतच्या निर्णयाचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक बोलाविण्यात आली आहे. सांगली, कोल्हापूर भागातील गावांना अलमट्टीमुळे पुन्हा संकटांना सामोरे जावे लागू नये, याची खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी सूचित केले.

समुद्रात वाहून जाणारे उल्हास खोऱ्यातील ६५ टीएमसी पाणी नदीजोड प्रकल्पातून वाचविण्याचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ६४ कोटींचा निधी देण्यात आला आहे. हे सर्वेक्षण लवकर पूर्ण करून या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पावर अवलंबून न राहता निधी कसा उभारता येईल, यादृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. बनावट रासायनिक खते आणि किटकनाशकांचे नाशिक हे केंद्र होत आहे. अनेक कंपन्या बनावट आहेत. त्यांची निकृष्ट दर्जाची उत्पादने शेतीचे नुकसान करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हॉटेलमध्ये वनस्पती तेलापासून पनीर

पुढील दीड वर्षात दूध उत्पादनाचे मोठे आव्हान राहणार असल्याचे कृषी महोत्सवाच्या समारोपात मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. गुजरातचे दूध बंद करा, असे काही जण म्हणतात. परंतु, अमूल समूह आपल्याकडून दूध विकत घेत असल्याने संकलन टिकून आहे. सध्या हॉटेलमध्ये मिळणारे पनीर दुधापासून नव्हे तर, वनस्पती तेलापासून तयार होते. दुधापासून तयार केलेले पनीर खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले.