वेगवेगळे आमिष दाखवून संशयितांनी ओटीपी क्रमांक मिळवीत बँक खातेदारांच्या खात्यातून तब्बल सव्वा दहा लाख रुपये लंपास केले. याबाबत दिनेशकुमार श्रीवास्तव (अशोकनगर) यांनी तक्रार दिली. एका व्यक्तीने जुलै महिन्यात श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला. विविध कारणे सांगून त्याने भ्रमणध्वनीवर आलेला ओटीपी क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील रोकड ऑनलाइन लांबविली. असाच प्रकार अन्य व्यक्तींसमवेतही झाला असून संशयिताने विविध बँक खातेदारांच्या खात्यातील सुमारे १० लाख १७ हजार ११८ रुपये परस्पर काढून घेतले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बस चालकास मारहाण
कट मारल्याच्या कारणातून दुचाकीस्वाराने बस थांबवून चालकास बेदम मारहाण केल्याची घटना वर्दळीच्या पंचवटी कारंजा भागात घडली. याबाबत मोहन सानप (नायगाव, सिन्नर) या बस चालकाने तक्रार दिली. सानप हे मंगळवारी भगूर-पंचवटी बसवर कार्यरत होते. सायंकाळी भगूर येथून प्रवासी घेऊन ते पंचवटी आगाराकडे जात असताना पंचवटी कारंजा बस थांबा भागात पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने बस थांबवली. शिवीगाळ करत चालकाच्या कक्षात येऊन सानप यांना मारहाण केली. संशयिताने सोनसाखळी आणि चष्मा तोडून नुकसान केले. या घटनेत चालकाची सोनसाखळी तुटून गहाळ झाली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोन्याची साखळी चोरली
काठेगल्ली परिसरात पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्य़ातील सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी दुचाकीवर आलेल्या चोरटय़ांनी खेचून नेली. याबाबत कामिनी उगले यांनी तक्रार दिली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाविद्यालयातील पंख्यांची चोरी
गंगापूर रस्त्यावरील ललित कला महाविद्यालयातील आवारातून चोरटय़ांनी पाच हजार रुपये किमतीचे १० पंखे चोरून नेले. याबाबत मुंजा नरवाडे यांनी तक्रार दिली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महात्मा गांधी रस्त्यावरील खून प्रकरणी दोघांना जन्मठेप
जुन्या भांडणाच्या कारणातून शहरातील मध्यवर्ती अशा महात्मा गांधी रस्त्यावर झालेल्या खून प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांनी दोघा आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंड सुनावला आहे. चेतन लेवे (२०) आणि सिद्धेश इश्ते (२०) ही शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे असून विधीसंघर्षित बालकाची बाल मंडळ न्यायालयाने बालनिरीक्षण गृहात रवानगी केली. .
शहराच्या मध्यवर्ती भागात आणि गजबजलेल्या व्यापारी पेठेतील महात्मा गांधी रस्त्यावरील एका हॉटेलजवळ मनीष रेवर (२३)याचा २०१८ मध्ये खून करण्यात आला होता. लेवे, इश्ते आणि एका विधीसंघर्षित बालकाने मनीषशी भांडणाची कुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली. मनीषने प्रतिकाराचा प्रयत्न केला असता त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या मनिषचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक भरतकुमार सूर्यवंशी यांनी संशयितांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
जिल्हा सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी आरोपींना दोषी ठरवत आजन्म कारावास आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न दिल्यास एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. रवींद्र निकम पक्षातर्फे काम पाहिले.