जळगाव – तालुक्यातील देवगाव शिवारात गिरणा काठावरील एका शेतात निंदणीचे काम करत असलेल्या वयोवृद्ध महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली होती. शासनाकडून मंजूर एकूण २५ लाखांच्या सानुग्रह अनुदानापैकी १० लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मृत महिलेच्या वारसांना रविवारी सोपविण्यात आला.
इंदुबाई वसंत पाटील (७३) सोमवारी दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतात निंदणीचे काम करत होत्या. आजुबाजुला कोणी नसल्याचे लक्षात घेऊन पिकांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. बिबट्याच्या हल्ल्याच डोक्यावर तसेच चेहऱ्यावर खोल जखमा झाल्यामुळे इंदूबाई गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी त्यांच्या जवळपास कोणीही नसल्याने तशाच जखमी अवस्थेत त्या शेतातच बराच वेळ पडून राहिल्या. दुसऱ्या एका शेतात काम करणारे बाळू पाटील आणि रमेश सोनवणे यांना काही वेळाने तिथे आल्यावर इंदूबाई जखमी अवस्थेत जमिनीवर पडून असल्याचे लक्षात आले. त्यानंतर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले.
तालुका पोलिसांसह वन विभागाने पंचनामा केल्यानुसार शासनाकडे सानुग्रह अनुदानासाठी तत्काळ प्रस्ताव पाठवण्यात आला. प्रत्यक्षात, तातडीची मदत म्हणून १० लाख रूपयांची रक्कम शासनाकडून लगेच मंजूर करण्यात आली. त्या रकमेचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मृत इंदूबाई पाटील यांच्या वारसांना सोपवला. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी नितीन बोरकर, नायब तहसीलदार राहुल वाघ, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चव्हाण, डॉ. कमलाकर पाटील, दूध संघाचे संचालक रमेश पाटील, शेतकी संघाचे संचालक विजय पाटील, दीपक सोनवणे, शिंदे गटाचे तालुका प्रमुख शिवराज पाटील, सरपंच जितेंद्र पाटील, वनपाल उमाकांत कोळी, वनरक्षक भरत पवार, पोलिस पाटील रमेश पाटील आदी उपस्थित होते.
२५ लाखांच्या सानुग्रह अनुदानापैकी १० लाख रुपयांचा धनादेश मृत इंदूबाई पाटील यांच्या वारसांना सोपविण्यात आला असला, तरी उर्वरित १५ लाख रुपयांचा धनादेश लवकरच देण्यात येईल. नरभक्षक बनलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पिंजरे लावण्यात आले असून, पथक सतत गस्त घालत आहे. शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात जाताना एकट्याने न जाता समूहाने जावे. गोठ्यातील जनावरे बंदिस्त ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.