नाशिक : त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील गटविकास अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक आयोजित करण्याचे तसेच संबंधित ठेकेदारांची चौकशी करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने पाणी पुरवठा अभियंत्यांनी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. जलजीवन मिशन योजनेची अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करून सर्व वाड्या-पाड्यांवर नळ पाणीपुरवठा योजना सुरू कराव्यात, निकृष्ट दर्जाच्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामाची चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी, यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयावर एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील महिलांचा हंडा मोर्चा काढण्यात आला.
केंद्र सरकारच्या वतीने जल जीवन योजनेतंर्गत जिल्ह्यात सर्व ठिकाणी कामे सुरू आहेत. मात्र या कामांमध्ये संथपणा आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटूंबांना २०२४ पर्यंत नळ पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. परंतु, ग्रामीण भागात आजही पाणी टंचाई आहे. त्र्यंबकेश्वर, नाशिक, पेठ, इगतपुरी या तालुक्यांतील गावांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी करावी, वगळण्यात आलेल्या आदिवासी पाड्यांचा योजनेत समावेश करावा, त्र्यंबकेश्वर-इगतपुरीसह नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अपूर्ण जलजीवन मिशन योजनेच्या कामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, वैतरणा धरणातून पाणी पुरवठा करण्यात यावा, आदी मागण्या मोर्चेकऱ्यांच्या वतीने करण्यात आल्या. शिष्टमंडळाने पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेत टंचाईविषयी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांनी डोक्यावर हंडा घेत आदिवासी नृत्य केले.