भाजप आमदाराचा उपोषणाचा इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासनाने महिला रुग्णालयासाठी जागा देण्याचे आदेश देऊन चार महिने उलटूनही महापालिका वेळकाढूपणा करत आहे. चोवीस तासात कार्यवाही न झाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा भाजपच्या देवयानी फरांदे यांनी विधानसभेत दिला. महापालिकेत भाजप सत्तेवर आहे.

विधानसभा अधिवेशनात आदल्या दिवशी जुने नाशिकचा क्लस्टर म्हणून विकास, एसआरए योजना लागू करणे आणि वाहनतळ नियमावली या संदर्भातील अहवाल सादर करण्यास महापालिका विलंब करीत असल्याची तक्रार केली गेली होती. दुसऱ्या दिवशी १०० खाटांच्या महिला रुग्णालयाचा विषय मांडून फरांदे यांनी पालिका प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाभानगर येथील जागा रुग्णालयासाठी देण्यास भाजपचे प्रदेश पदाधिकारी वसंत गिते, उपमहापौर अजिंक्य गीते यांनी विरोध दर्शविला होता. या मुद्यावरून झालेल्या गिते आणि फरांदे यांच्यातील  वादामुळे पालिका प्रशासनाने भाभानगर येथील जागा महिला रुग्णालयासाठी उपलब्ध करण्याची तसदी घेतली नाही. त्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. वैद्यकीय सुविधांअभावी महिलेची प्रसूती रुग्णालयाबाहेर होऊन बालक दगावल्याची घटना महापालिकेच्या जाकीर हुसेन रुग्णालयात घडली. नाशिक महापालिकेतील रुग्णालयात घडलेली ही पहिली घटना नाही. उपचाराअभावी बालकांचा मृत्यू होत असताना महिला रुग्णालयासाठी महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप फरांदे यांनी केला. महिला रुग्णालयासाठी जागा देण्याचे आदेश शासनाने २२ फेब्रुवारी २०१८ रोजी दिले असतानाही महानगरपालिका चालढकल करीत आहे.  ही बाब अत्यंत गंभीर असून शासनाने त्याची दखल घ्यावी, असे आदेश अध्यक्ष हरिभाऊ  बागडे यांनी दिले. यावेळी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी याबाबत माहिती घेवून सभागृहात निवेदन करण्यात येईल असे आश्वासन दिले. भाजप- महापालिका प्रशासन वादाचा नवीन अंक विधानसभेत सुरू झाला आहे. मागील आठवडय़ात भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आयुक्तांच्या कार्यपध्दतीविषयी तक्रारी मांडल्या होत्या. त्यावेळी आयुक्तांनी ठोस भूमिका घेऊन नियमबाह्य़ कामे करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.  तक्रारींवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यावेळी दिले.  भाजप पदाधिकाऱ्यांनी  पालिका प्रशासनाची कोंडी करण्याची अशी धडपड सुरू केली आहे.

रुग्णालय जागेचा वाद

१०० खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी महानगरपालिकेने भाभानगर येथील सव्‍‌र्हे क्रमांक २६ आणि २७ येथील आरक्षित जागेपैकी एक हजार चौरस मीटर जागा जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्याचे निर्देश नगर विकास विभागाने दिले आहेत. २२ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशाची अद्याप पूर्तता झालेली नाही. भाभानगर येथील जागा रुग्णालयास देण्यास भाजपचे प्रदेश पदाधिकारी वसंत गिते आणि उपमहापौर अजिंक्य गीते यांचा विरोध आहे. स्थानिक नागरिकांनी जागा देण्याविरोधात केलेल्या आंदोलनात उपमहापौर सहभागी झाले होते. गीते-फरांदे यांच्यात आधीपासून मतभेद आहेत. रुग्णालयाच्या निमित्ताने त्यात अधिक भर पडली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens hospital land crisis bjp
First published on: 18-07-2018 at 01:21 IST