जळगाव – केंद्रीय लोकसेवा आयोगाने अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला. त्यात जिल्ह्यातील आमोदे (ता.यावल) येथील योगेश पाटील या तरूणाने ८११ क्रमांकाने यश संपादित केले आहे. विशेष म्हणजे त्याचे वडील गावी किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजेच युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे हे अनेकांचे स्वप्न असते. या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तरुण रात्रंदिवस अभ्यास करतात. आपल्या मनोरंजनाच्या सर्व इच्छा बाजूला ठेवत केवळ अभ्यास एके अभ्यास यावर लक्ष केंद्रिंत करतात. इतके करुनही अनेकांच्या पदरी अपयश येते.
काही जण तर केवळ एक किंवा दोन टक्क्यांनी मागे राहतात. काही जण परीक्षेत एकदा अपयश आल्यावर पुन्हा नव्या जोमाने पुढील परीक्षेसाठी तयारी करतात. युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देशसेवा करण्याची संधी अनेक जण साधतात. त्यासाठी केवळ अभ्यासावर भर न देता काही युवक आयएस झालेल्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून या परीक्षेच्या तयारीविषयी विशेष काय करता येणे शक्य आहे, ते जाणून घेतात. अनेक जण युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी घरदार सोडून मोठ्या शहरांमध्ये तयारीसाठी येतात. त्यांचे खाण्यापिण्याकडेही दुर्लक्ष होते. त्यांचे ध्येय केवळ युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे हे असते.
अशाच काही ध्येयवादी युवकांमधील एक नाव म्हणजे योगेश पाटील. जळगावच्या यावल तालुक्यातील आमोदे येथील योगेश युपीएससी उत्तीर्ण होण्याच्या इच्छेने झपाटला होता. त्यासाठी त्याने गाव सोडले. मुंबईचा रस्ता धरला. अंबरनाथ येथे आत्याकडे राहुन दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीचे शिक्षण ठाण्यात तसेच बी.टेकचे शिक्षण नागपूरमध्ये पूर्ण केले. घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच,
त्याने आएएस अधिकारी होण्यासाठी तयारी सुरु केली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. युपीएससी परीक्षेची तयारी करताना योगेशला कुटुंबियांची व नातेवाईकांची खंबीर साथ वेळोवेळी मिळाली. घरबसल्या युट्युबवरील उपयुक्त चित्रफित पाहुन तसेच पुस्तकांचे वाचन करून केवळ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेवर त्याने लक्ष्य केंद्रीत केले होते. पहिल्या तीन प्रयत्नात अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, योगेशने आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून चिकाटीने अभ्यास सुरूच ठेवला. अखेर चौथ्या प्रयत्नात त्यास युपीएससीच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवता आला. योगेशचे वडील ललित पाटील यांचे किराणा दुकान आहे.