लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: शहरात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खूनांची मालिका सुरुच असून नवीन नाशिक परिसरात काही दिवसापासून हा आलेख वाढत आहे. या मालिकेत मंगळवारी रात्री २४ वर्षाच्या युवकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.
काही दिवसांपासून नवीन नाशिक परिसरात गुन्हेगारी कारवाया सुरू आहेत. सराईत गुन्हेगार तसेच भाजप माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष राकेश कोष्टी याच्यावर झालेला हल्ला, काही दिवसांपूर्वी भ्रमणध्वनी परत करण्यासाठी गेलेल्या युवकावर झालेला हल्ला, या हल्ल्यात त्याचा झालेला मृत्यू, कामगारांना बंदुकीचा धाक दाखवून भ्रमणध्वनी हिसकाविणे, अशा घटना घडत असतांना या गुन्हेगारी साखळीत परशुराम नजान याच्या हत्येने भर पडली आहे. परशुराम हा मंगळवारी रात्री उशीरा त्याच्या काही मित्रांसोबत जेवण करण्यासाठी हॉटेलात गेला होता. त्याच्या सोबत असलेल्या मित्राचे आणि संशयितांचे चार-पाच दिवसांपूर्वी वाद झाले होते.
आणखी वाचा- नाशिक: बलात्कार प्रकरणी विद्यार्थी सेनेच्या माजी जिल्हाप्रमुखास अटक
मागील भांडणाची कुरापत काढून संशयितांनी परशुराम आणि त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरूवात केली. परशुराम हा प्रतिकार करत असतांना संशयितांनी हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर पडलेला पेव्हर ब्लॉक उचलून त्याच्या डोक्यात टाकला. यात परशुराम हा गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर संशयित फरार झाले. जखमी परशुरामला मित्रांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतांना परशुरामचा मृत्यू झाला. या प्रकरणी नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.