लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : सातपूर आयआयटी सिग्नलजवळील नाईस संकुलमध्ये नव्याने सुरू झालेल्या मद्य दुकानासाठी या परिसरातील पुरातन प्रार्थनास्थळ हटविण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची तक्रार करत युवा सेनेच्यावतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मद्य दुकान त्वरित बंद करून प्रार्थनास्थळाचे पावित्र्य जपावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यासंदर्भात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रुपेश पालकर, विस्तारक योगेश बेलदार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांना निवेदन दिले. सातपूर आयटीआय सिग्नललगत नाईस संकुल आहे. या ठिकाणी पुरातन प्रार्थनास्थळ आहे. या ठिकाणी भाविक, धार्मिक संस्थेमार्फत पूजा केली जाते. या संकुलात नव्याने सुरू झालेल्या मद्य दुकानासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून प्रार्थनास्थळ हटविण्यासाठी कारवाई सुरू असून ती त्वरित थांबबावी, नियमबाह्य मद्य दुकान बंद करावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

आणखी वाचा-दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मद्य दुकानासाठी प्रार्थनास्थळ हटविण्याच्या शक्यतेमुळे भाविकांमध्ये संतप्त भावना आहेत. विभागाने नियमबाह्यपणे सुरू केलेले मद्य दुकान त्वरित बंद करावे, अशी मागणी बेलदार, पालकर यांच्यासह दिगंबर नाडे, किरण फडोळ आदींनी केली आहे.