हरियाणा ‘आरटीओ’ची चौकशी होणार

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी भंगारात काढलेल्या वाहनांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक केली असून ७ कोटींची १५१ वाहने जप्त केली आहेत. यातील दिल्लीत १५ वाहने असून ती तेथेच नष्ट करण्यात येणार आहेत. तर हरियाणा उपप्रादेशिक कार्यालयात पाच वाहनांची नोंद करण्यात आली असून त्यांची नवी मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी शंभर एक वाहने ही महाराष्ट्रातूनच जप्त करण्यात आली आहेत, तर इतर वाहने इतर राज्यातून जप्त केली आहेत. यासाठी नवी मुंबई पोलिसांना आर्थिक भरुदड सहन करावा लागला आहे. यासाठी किती खर्च आला हे अद्याप पोलिसांनी सांगितले नाही. मात्र दिल्लीत यातल १५ वाहने असून ती परत नवी मुंबईत आणण्याऐवजी तेथेच नष्ट करण्याचा विचार असल्याचे नवी मुंबई पोलिसांनी सांगितले. यानिमित्त नवी मुंबई पोलिसांनी वापरलेली वाहने खरेदी करताना कमी पैशात मिळतात म्हणून न घेता त्याबाबत खबरदारी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

ही सर्व वाहने मारुती सुझुकी कंपनीची असून कंपनीने ती भंगारात विकली होती. त्याचे चेसी क्रमांकही नष्ट केले होते. मात्र आरोपीने कंपनीतील कर्मचाऱ्याला हाताशी धरत चेसी क्रमांक मिळवून ती विक्रीसाठी उपलब्ध केली होती. यात काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. चेसी क्रमांक व बनावट कागदपत्र हुबेहुब बनवणे हे धक्कादायक असून यातील आरोपींचा शोध घेत हे बनवणारे रॅकटही नष्ट करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

आनम सिद्धिकी या आरोपीने सदर वाहन भंगारात विकत घेतली. मात्र ती नष्ट न करता चेसी क्रमांक बदलून विक्रीस काढली होती. यासाठी पनवेल येथील श्री बालाजी लॉज येथे कार्यालय थाटले होते. यासाठी विविध ठिकाणच्या सहा जणांचे साहाय्य घेतले होते. औरंगाबाद येथील इम्रान याला अट्र केली असून तो बनावट चेसी क्रमांक लोखंडावर उमटवून त्याचे वेल्डिंग करीत असे. तर वाहनांचे मूळ चेसी क्रमांक मनोहर जाधव याने पुरवले होते. तो  कंपनीत लिपिक पदावर कामास होता. सदर वाहने ही हरियाणा, गुजरात, कर्नाटक, तेलंगाना, राजस्थान, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, दिल्ली परिसरात होती. ती नवी मुंबईत आणण्यासाठी पोलिसांना लाखो रुपये खर्च आला. विशेष म्हणजे अजून १५ गाडय़ा दिल्ली येथेच ठेवण्यात आल्या आहेत.

बनावट कागदपत्रे गंभीर बाब

बंदी असलेल्या गाडय़ांची विक्री मोठा गुन्हा असला तर पोलिसांनी चेसी क्रमांक हुबेहूब बनविण्यात आले, हे अतिशय गंभीर आहे. त्याचप्रमाणे वाहनांची कागपत्रेही बनावट बनविण्यात आली आहेत. त्याचाही सखोल तपास  पोलीस करीत आहेत.

स्वस्तात गाडी मिळते म्हणून चौकशी न करता घेऊ  नये, अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. फसवणूक प्रकारचा गुन्हा उकल होऊ  शकतो, मात्र त्यात आर्थिक वसुली हा खूप किचकट बाब आहे. त्यामुळे ग्राहकांनी वाहन खरेदी करताना किंमत न बघता कागदपत्रे, चेसी क्रमांक संबधित उपप्रादेशिक कार्यालयात तपासून घ्यावीत.

-बी.जी.शेखर पाटील, सहआयुक्त गुन्हे