नवी मुंबई पालिकेचा अजब निर्णय; अमृत योजनेअंतर्गत प्रकल्पासाठी २६८ झाडांवर कुऱ्हाड

केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत वाशी येथील प्रसिद्ध मिनी चौपाटीलगत हरित पट्टा निर्माण करण्यासाठी २६८ झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू आहे. पालिकेने याबाबत हरकती सूचना मागविल्या आहेत. परंतु असलेली झाडे तोडून हरित पट्टा निर्माण करण्याची ही कसली अजब योजना, असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे. याबाबत नागरिक व वृक्षसंवर्धन संस्था आंदोलनाच्या तयारीत आहेत.

केंद्र शासनामार्फत अमृत योजनेअंतर्गत मोकळ्या जागेवर हरितपट्टे विकसित करण्यात येत आहेत. नवीन झाडांची लागवड आणि संवर्धन करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. मुंबई तसेच आरे कॉलनी परिसरातील झाडे, मेट्रो व इतर कामांसाठी तोडण्यावरून वाद सुरू आहेत. त्यापाठोपाठ आता नवी मुंबई महापालिकेनेही हरितपट्टय़ांच्या नावाखाली वृक्षतोड करण्याचा डाव आखला आहे का, असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडू लागला आहे.

वाशीतील मिनी सीशोअर परिसर पर्यटनाकांचे, फेरफटक्यासाठी येणाऱ्यांचे, जॉगिंग करणाऱ्यांचे आणि महाविद्यालयीन तरुणांचे आवडते ठिकाण आहे. येथे नेहमी गर्दी असते. खाडीकिनारी अनेक वृक्ष असल्यामुळे येथील वातावरण नेहमीच आल्हादायक असते. सुट्टीच्या दिवशी तर मोठी गर्दी पाहायला असते. याच ठिकाणी शहरातील राजकीय नेते, अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक जॉगिंगसाठी येतात.

या परिसरात मोठय़ा प्रमाणात सुबाभूळ, गुलमोहर आणि अन्यही विविध जुनी झाडे आहेत. जॉगिंग ट्रॅक बांधण्यासाठी आहे त्या सौंदर्यावर घाला घातला जाण्याची शंका येथे फेरफटका मारण्यासाठी येणारे व्यक्त करू लागले आहेत. या झाडांवरून राजकीय पुढाऱ्यांचे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. वाशी खाडीजवळील सेक्टर १०-ए येथे ही २९८ झाडे असून त्यांपैकी २६८ झाडांवर कुऱ्हाड चालवून हरित पट्टा निर्माण केला जाणार आहे. पालिकेने याबाबत हरकती मागवल्या आहेत. माजी उपमहापौर अविनाश लाड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

महापालिका झाडे तोडून हरित पट्टा बनवणार असेल तर नवलच आहे. आहे त्या झाडांचे संवर्धन व्हावे, यासाठी पालिकेने योग्य पावले उचलली पाहिजेत. विकासाच्या व जॉगिंग ट्रॅकच्या नावाखाली पालिकेचा हा दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे.

– आबा रणावरे, वृक्षप्रेमी

वाशी सेक्टर १० जवळ अमृत योजनेतून हरित पट्टा निर्माण केला जाणार आहे. येथे जॉगिंग ट्रॅकची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी २६८ झाडे तोडण्यात येणार आहेत, ही चुकीची माहिती आहे. केवळ ९० झाडेच तोडण्यात येणार आहेत. पालिकेने दिलेल्या माहितीमध्ये चूक झाली असून ती दुरुस्त करण्यात येणार आहे. सुबाभळीच्या या झाडांमुळे इतर कोणतीच झाडे उगवत नसल्याने येथे १० हजार विविध झाडे लावण्यात येणार आहेत.

– तुषार पवार, उपायुक्त उद्यान विभाग, नवी मुंबई महापालिका