३१ ते ४० वर्षे वयोगटातील बाधितांची संख्या ४,७६४;संपर्कातील १० वर्षे वयोगटातील ९९१ मुलांना संसर्ग

नवी मुंबई : रोजगार वा व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या ३१ ते ४० वयोगटातील कमावत्या व्यक्ती करोनाच्या विळख्यात सापडल्या आहेतच, पण घरात त्यांच्या संपर्कात आलेल्या ० ते १० वयोगटातील मुलांनाही बाधा झाल्याचे नवी मुंबई पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सध्या नवी मुंबईत ३१ ते ४० वर्षे वयोगटातील बाधितांची संख्या ४,७६४ इतकी आहे, तर ० ते १० वर्षे वयोगटातील ९९१ जण बाधित झाले आहेत. शहरात आजवर २१ हजार ४७३ जण करोनाबाधित झाले आहेत. त्याच वेळी करोनामुक्तीचा दर ८२ टक्क्यांवर आला असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ३५०० इतकी आहे.

शहरातील मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट  पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठेवले आहे. यासाठी होणाऱ्या प्रत्येक मृत्यूबाबतचे विश्लेषण रोज सायंकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले जात आहे. यात दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून माहिती आणि मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. यात खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचाही समावेश आहे. १ ते १०० वयोगटात सर्वाधिक रुग्ण हे ३१  ते ४० वयोगटातील आहेत. तर सर्वात कमी बाधित हे ९१ ते १०० वयोगटातील आहेत.

५१ ते ६० वयोगटातील बाधितांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ३ टक्क्यांवर असलेला मृत्युदर महिनाभरात २.४० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. शहरातील करोनामुक्तीचा दर चांगला असला तरी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केली आहे.

 

बाधित व मृत्यू

वय            रुग्ण         मृत्यू

० ते १०      ९९१            ०१

११ ते २०     १६०३        ०४

२१ ते ३०     ४४४१        १६

३१ ते ४०     ४७६४        २९

४१ ते ५०     ४००५        ६९

५१ ते ६०     ३३३१       १५५

६१ ते ७०     १५८६       १३६

७१ ते ८०     ५८५          ७१

८१ ते  ९०    १४४          ३३

९१ ते १००    २३            ०१

५१५ आजवर एकूण मृत्यू