|| शेखर हंप्रस

खिडक्यांना काळ्या काचा लावणाऱ्यांनाही दंड :- नवी मुंबई वाहतूक शाखेला देण्यात आलेल्या ‘इंटरसेप्टर व्हेईकल’च्या (अत्याधुनिक वाहन) मदतीने वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या २५६ वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. याशिवाय वाहनाच्या काचांना काळी पट्टी लावलेल्या ४० वाहनांवर शीव-पनवेल महामार्ग आणि पाम बीच रस्त्यावर कारवाई करण्यात आली.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने होणारे अपघात रोखण्यासाठी राज्यभरात वाहतूक पोलिसांना ‘इंटरसेप्टर व्हेईकल’ पुरविण्यात आली आहेत. नवी मुंबई वाहतूक शाखेला सध्या अशी दोन वाहने पुरविण्यात आली आहेत. ती शीव-पनवेल महामार्ग आणि पाम बीच मार्गावर सज्ज असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली.

सध्या तरी ‘इंटरसेप्टर व्हेईकल’च्या मदतीने वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर आणि वाहनांच्या काचांना काळ्या पट्टय़ा (फिल्म) लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. बेफाम वेगाने वाहन चालविल्याने पाम बीच मार्गावर आजवर सर्वाधिक अपघात झाले आहेत. मुंबई-पुणेदरम्यानच्या द्रुतगती मार्गावर शुक्रवारी पहाटे अतिवेगामुळे कारला झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर द्रुतगती मार्गावरील वाहनांच्या गतीवर आणखी र्निबध येण्याची शक्यता आहे.

स्थानिक पुढाऱ्यांकडून नियमभंग

सुरक्षेच्या कारणास्तव महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या खिडकीच्या काचांना काळ्या फिल्म लावण्याची परवानगी आहे. मात्र स्थानिक पुढारी, त्यासह काही गब्बर कार्यकर्ते वाहनांच्या काळ्या फिल्म लावून गावोगाव, शहरात फिरत आहेत. अशा फिल्म बसवायच्या असल्यास त्या किमान ३० टक्के पारदर्शक असायला हव्यात, असा सामान्यांसाठी दंडक आहे. मात्र या नियमाला तिलांजली देत अनेक जण खिडक्यांच्या काचांना काळ्या पट्टय़ा लावत आहेत.

मुंब्रा-पनवेल मार्गावर वाळूचे ट्रक बेफाम

शीव-पनवेल महामार्ग, कळंबोलीनंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि पाम बीच मार्गावर वेगाची मर्यादा न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू करण्यात आली असली तरी मुंब्रा-पनवेल मार्ग, महापे-कल्याण मार्ग तसेच पनवेल जेएनपीटी या मार्गावर वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन सर्रास केले जात आहे. वाळूची वाहतूक करणारे डंपर अधिकाधिक फेऱ्या पूर्ण करण्यासाठी बेफाम वेगाने गाडय़ा दामटवत आहेत. रात्रीच्या वेळेस मुंब्रा-पनवेल मार्गावर तब्बल ताशी ८० किलोमीटर वेगाने हाकल्या जात आहेत. हे सारे प्रकार मुंब्रा-पनवेल मार्गाच्या मध्य भागात घडत आहेत. त्यामुळे छोटी वाहने, दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून ये-जा करावी लागत आहे.

काळ्या काचा -४०

काचांवर काळी पट्टी लावलेली वाहने.- २४

वाहने पाम बीच मार्गावर – १६

वाहने शीव-पनवेल महामार्गावर