या आठवडय़ात नर्सेसची भरती प्रक्रिया राबविणार

नवी मुंबई आरोग्य सेवेसाठी लागणाऱ्या ४३८ कर्मचारी व डॉक्टरांच्या भरतीला राज्य शासनाने मंजुरी देऊन वर्षे लोटले तरी नवी मुंबई पालिकेची ऐरोली व नेरुळ येथील रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. वाशी येथील पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयात वाढणारी रुग्णांची संख्या तेथील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. या रुग्णालयात नवी मुंबई व्यतिरिक्त मुंब्रा, मानखुर्द, गोवंडी, पनवेल या पालिका क्षेत्राबाहेरील रुग्णांची संख्याही जास्त आहे.

नवी मुंबई पालिकेने बारा लाख लोकसंख्येसाठी ग्रामीण व शहरी पातळीवर चारस्तरीय आरोग्य सेवा राबविली गेली आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता वाशी येथील तीनशे खाटांचे सार्वजनिक रुग्णालय अपुरे पडत आहे. त्यामुळे ऐरोली व नेरुळ येथील माताबाल संगोपनाच्या इमारती तोडून त्या ठिकाणी १०० खाटांची दोन रुग्णालये बांधून तयार आहेत. या रुग्णालयांवर पालिकेने दोनशे कोटींपेक्षा जास्त खर्च केला असून केवळ कर्मचारी, डॉक्टर तुटवडा, वैद्यकीय साहित्यांचा अभाव यामुळे ही अद्ययावत रुग्णालयांच्या इमारती चार वर्षे बांधून उभ्या आहेत. विशेष म्हणजे नेरुळ येथील पालिका रुग्णालयात इमारत बांधकाम करताना टाकावी लागणारी गॅस वाहिनीच टाकण्यास कंत्राटदार विसरला आणि अभियंता विभागाने त्याकडे डोळेझाक केली. त्यामुळे या कामाची नव्याने निविदा काढून ते काम पूर्ण करावे लागले आहे. गेली पाच वर्षे ही रुग्णालये सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मध्यंतरी नगरसेवकांच्या दबावामुळे या रुग्णालयात तात्पुरती बाह्य़रुग्ण आणि काही कक्ष सुरू करण्यात आले आहेत. मात्र आजारी पडणाऱ्या रुग्णांना वाशी येथील रुग्णालय गाठण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

नवी मुंबईची भौगोलिक रचना सरळ रेषेत असल्याने दिघा येथील रुग्णाला वाशी येथे येईपर्यंत उपचार मिळत नसल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. ऐरोली येथील एका महिलेला प्रसूतीसाठी वाशीत जाईपर्यंत जीव गमवावा लागला होता. त्यात पावसाळ्यात वाशी येथील पालिका रुग्णालय भरून जात असून काही रुग्णांना खाली जमिनीवर उपचार घ्यावे लागत असतात. त्यामुळे पालिकेच्या नेरुळ आणि ऐरोली येथील रुग्णालयांची गरज अधोरेखित होत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागात कर्मचारी व डॉक्टरांचा तुटवडा असल्याची कारणे यापूर्वी प्रशासनाच्या वतीने दिली जात होती. राज्य शासनाने पालिकेच्या आकृतिबंधाला मान्यता देताना आरोग्य व अग्निशमन दलासाठी तत्काळ नोकरभरती करण्याचे आदेश मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये दिलेले आहेत.

पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी शिक्षण व आरोग्य सेवेला महत्त्व देणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे, पण इमारती बांधून तयार असलेली रुग्णालये अद्याप सुरू करता आलेली नाहीत. एमबीबीएस झालेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी पालिकेने पोस्ट गॅ्रज्युएट वर्ग सुरू केल्याने आता ५० डॉक्टर पालिकेला मिळाले आहेत. या पालिकेत करिअर करण्यास येणाऱ्या डॉक्टरांची संख्या कमी आहे. डॉक्टरांची भरती झाल्यानंतर नर्सेसची भरती प्रक्रिया या आठवडय़ात राबविली जाणार आहे. या व्यतिरिक्त लागणारा कर्मचारी भरण्यात आलेला नाही. ही सर्व प्रक्रिया कासवगतीने राबविली जात आहे.

पालिकेच्या रुग्णालयांसाठी लागणारा कर्मचारीवर्ग भरती प्रक्रिया महाऑनलाइनद्वारे सुरू आहे. यातील नर्सेसची भरती १८ नोव्हेंबर रोजी आहे. त्यानंतर ही दोन्ही रुग्णालये सुरू करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

– डॉ. दयानंद कटके, मुख्य आरोग्य अधिकारी, नवी मुंबई पालिका