अनिल कौशिक पुन्हा रिंगणात

नवी मुंबई पालिका स्थापनेपासून पालिका सभागृहातील संख्याबळ प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत घटणाऱ्या स्थानिक काँग्रेसमधील फेरबदलांना सुरुवात झाली आहे. अनेक ब्लॉक, जिल्हा कार्यकारिणी आणि शहर अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उत्तरांचल काँग्रेसचे पदाधिकारी चंचल चॅटर्जी यांच्या नियंत्रणाखाली या निवडणुका होत असून पाच ऑक्टोबपर्यंत या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदासाठी यावेळी माजी उपमहापौर अनिल कौशिक व ओबीसी सेलचे अध्यक्ष अकुंश सोनावणे स्पर्धेत आहेत. विद्यमान अध्यक्ष दशरथ भगत यांचीही पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कधी काळी नवी मुंबई काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या शिवसेना प्रवेशानंतर या बालेकिल्ल्याचे बुरुज ढासळू लागले होते. एप्रिल १९९५ मध्ये झालेल्या पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत नाईक यांनी शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकविल्यानंतर काँग्रेसचे येथील अस्तित्व संपू लागल्याची भावना निर्माण झाली होती. सप्टेंबर १९९९ मध्ये नाईक यांनी शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर येथे राष्ट्रवादीचे प्राबल्य वाढले, पण काँग्रेस मात्र डोके वर काढू शकली नाही. त्यानंतर गेल्या २२ वर्षांत या पक्षाला उभारी मिळण्याऐवजी हा पक्ष दिवसेंदिवस अधिक खचत गेला.

मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला १० नगरसेवकांचा पाठिंबा देऊन या पक्षाने उपमहापौरपद पदरात पाडून घेतले आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीत पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्षाने पुन्हा कंबर कसली असून सध्या पक्ष सदस्यसंख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. यातून बुथ, ब्लॉक यांची निवड केली जाणार असून ब्लॉक अध्यक्ष आणि कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या मतदानावर पक्षाचा स्थानिक अध्यक्ष निवडला जाणार आहे. या स्पर्धेत माजी उपमहापौर व मध्यंतरी पक्षाबाहेर पडून हरयाणात विधानसभा निवडणुकीत नशीब अजमावणारे पण पराभव पदरी पडलेले अनिल कौशिक व ऐरोलीतील नगरसेविका हेमांगी सोनावणे यांचे पती व ओबीसी सेलचे अध्यक्ष अंकुश सोनावणे आहेत. यापैकी कौशिक यांची दिल्लीतील ऊठबस पाहता ते बाजी मारण्याची शक्यता आहे, मात्र कौशिक यांच्याविरोधात स्थानिक सर्व नगरसेवक व पदाधिकारी एकवटले असल्याने सोनावणे यांच्या गळ्यात ही माळ पडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

कार्यकर्त्यांच्या बळाअभावी आंदोलने निष्प्रभ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील जनतेचे अनेक प्रश्न घेऊन काँग्रेस आंदोलने करण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यकर्त्यांचे बळ नसल्याने हे प्रयत्न केविलवाणे ठरत असल्याचे दिसते. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठविणारे ठाणे लोकसभा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांत भगत यांनी मंगळवारी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांची भेट घेऊन बेलापूर तालुक्यातील बंद करण्यात येणाऱ्या साडेबारा टक्के योजनेविषयी नाराजी व्यक्त केली. नवी मुंंबईतील शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत सिडको कोणतीही योजना बंद करू शकत नाही. सिडको अशा प्रकारे लोकप्रतिनिधींना डावलून निर्णय घेणार असेल, तर असलेले प्रकल्पग्रस्त शांत बसणार नाहीत. साडेबारा टक्के योजना बंद करणार असाल तर, सिडकोलाच टाळे लावण्याचा कार्यक्रम प्रकल्पग्रस्त हाती घेतील असा इशारा भगत यांनी दिला आहे.